लोणावळा : लोणावळा येथील अँबी व्हॅली सहारा सिटीमध्ये अजगराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गोळ्या झाडूनही अजगराचा मृत्यू न झाल्याने त्याचे शीर धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला अर्धवट जाळून पुरण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळचे अध्यक्ष नीलेश गराडे यांनी याबाबत वनखात्याला माहिती दिली. यानंतर निलम उपाध्याय, हार्दिक मालवाडीया, वनरक्षक सविता चंद्रशेखर रेड्डी पाटील, यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळ शोधून काढत अर्धवट जळालेला, डोके धडावेगळे केलेला व दोन गोळ्या झाडून हत्या केलेल्या अजगर आढळून आला.
अधिकार्यांकडून गुन्ह्याची कबुली
याबाबत संबंधित अधिकारी कॅप्टन कबीर सुभेदार, सहारा अग्निशमन खात्यात काम करणारे ज्ञानेश्वर तोडले, के. पी. रामचंद्रा यांची चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. स्वतःच्या समाधानासाठी असे केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी वापरलेली बंदूक, कुर्हाड व काठ्या जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडे सोपवण्यात आला आहे.