आंबेगाव । अंगणवाडी कर्मचार्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. शासनाने त्यांचे मानधन त्वरीत बँकेमध्ये जमा करावे, अशी मागणी आंबेगाव तालुका अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा कलावती पोटकुले यांनी केली आहे.राज्यातील सुमारे 20 हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचार्यांना जून 2017 पासून मानधनच मिळालेले नाही. बँक खात्याचा नंबर, आधारकार्ड यामध्ये कार्यालयाकडून झालेल्या गफलतीचा फटका त्यांना बसलेला आहे. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. अनेकांचे मानधन एअरटेल किंवा आयडीया मोबाईल कंपन्याच्या खात्यावर जमा झाल्याचे किस्से आहेत.
शासनाचे दुर्लक्ष
याच अनास्थेतून परभणी जिल्ह्यातील जिंतुर प्रकल्पातील अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पण यातून महिला व बालकल्याण खात्याने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. कारण गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. शासन बेफिकीर आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यालयांमध्ये अनास्था आढळून येते व अंगणवाडी कर्मचार्यांना त्याचा सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे.
पेन्शनपासून वंचित
मिनी अंगणवाडीसेविकांना 750 रूपये मानधन 2013 मध्ये वाढविले. पण आजपर्यंत 22 महिन्यांचे फरक मिळालेलेच नाहीत. एप्रिल 2014 पासून जाहीर झालेली एकरकमी पेन्शन घोडेगाव प्रकल्पातील एकही कर्मचार्यांना मिळालेली नाही. काही निवृत्त कर्मचारी त्यांचे शेवटचे दिवस मोजीत आहेत. दिवाळीच्या भाऊबीज भेटीची वाट या भगिनी एक महिन्यानंतरही पाहत आहेत. तर महिन्यापूर्वी झालेल्या मानधनवाढीचा अजून जी.आर सुद्धा काढलेला नाही. एप्रिल 2014 ला मिळालेली मानधनवाढ सहा महिन्यानंतर परत कापून घेतली. तीसुद्धा आजतागत परत मिळालेली नाही, अशा अनेक समस्यांमुळे अंगणवाडीसेविकांचे हाल होत आहेत.
वेतन मिळेना ऑनलाईन
छोटी-मोठी माहिती घेण्यासाठी अंगणवाडीसेविकांना कार्यालयात बोलविले जाते. पण वेळ तर वाया जातोच. तर प्रवास खर्चाचा भुर्दंडही पडतो. अंगणवाडी कर्मचार्यांना नियमीत मानधन मिळावे या हेतूने महिला व बालकल्याण खात्याने कर्मचार्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन मानधन देण्याचे मान्य करून सुरूही केले. पण सद्यस्थितीत मानधन मात्र ऑनलाईन पद्धतीने मिळत नसल्याचा दावा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या तालुकाध्यक्ष कलावती पोटकुले आणि विक्रम शिंदे यांनी केला आहे.