अंगणात नातीला फिरवत असलेल्या आजीची धुम स्टाईलने पोत लांबविली

0

जळगाव । शहरातील निवृत्ती नगरात शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एक महिला (आजी) तिच्या नातीला घेवून घराबाहेर फिरत होती. त्यावेळी काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत धुम स्टाईलने लांबविली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून धुम स्टाईलने पोत लांबविण्याचे प्रकार बंद झाले होते. परंतू शनिवारी झालेल्या या घटनेमुळे पुन्हा धूम स्टाईलने सोन्याच्या पोता लांबविणारी टोळी शहरात सक्रीय झाल्याचे उघड झाले आहे.

पल्सरवरून आले दोघे..

निवृत्ती नगरात रहिवासी निर्मला सुभाष पाटील (वय-50) ह्या विकास आणि विश्‍वेष या मुलांसह सुन व नातीसोबत राहतात. शनिवारी दुपारी निर्मला पाटील ह्या दिड वर्षाची नातं अनुष्का हिला सोबत घेवून घराबाहेर फिरत होत्या. यानंतर समोर असलेल्या मोकळ्या मैदानातून नातीला फिरवून आणल्यानंतर त्या घराजवळ असलेल्या वानखेडे यांच्या घराजवळ उभ्या होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या पल्सरवरून दोन तरूण निमृला पाटील यांच्या घराच्या पुढे गेले. यानंतर गल्लीत कोणीही नसल्याची संधी पाहत त्यांनी वळण घेत पुन्हा निर्मला पाटील यांच्याजवळ येवून गळ्यातील 90 हजार रुपये किंतीची 32 ग्रँम सोन्याची पोत ओढून आसारामबापू आश्रमाच्या दिशेने पसार झाले.

अन्.. चोरटे झाले पसार

गळ्यातील पोत ओढून दुचाकीस्वार पसार होताच निर्मला पाटील यांनी आरडा-ओरडा करण्यास सुरूवात केली. निर्मला पाटील यांचा आवाज येताच गल्लीतील रहिवाश्यांनी घराबाहेर धाव घेतली. व त्यांना काय झाले विचारपूस केली. त्यांनी पोत लांबविल्याचे सांगताच. गल्लीतील दोन रहिवाश्यांनी लागलीच आपल्या मोटारसायकल काढून चोरटे पसार झालेल्या दिशेने पळवल्या. मात्र, त्यांना देखील चोरट्यांना पकडणे शक्य झाले नाही. यानंतर जिल्हा पेठ पोलीसांना परिसरातील काही नागरिकांनी माहिती देताच पीएसआय गिरधर निकम, पोलीस कर्मचारी भटू नेरकर, पवार आदी कर्मचारी घटनास्थळी येवून त्यांनी परिसराची पाहणी केली. मात्र, त्यांनाही चोरट्यांबाबत कोणतेही सुगावे मिळाले नाही. त्यानंतर निर्मला पाटील यांनी दोन्ही मुलांसोबत घेवून जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. घडलेल्या संपूर्ण हकीकत सांगून अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चैन स्नॅचर शंहरात सक्रीय

यातच शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफाड्या, दुचाकी चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. दरम्यान, धूम स्टाईलने पोता लांबविल्याच्या घटनाही गेल्या काही महिन्यांपासून बंद झाल्या होत्या. परंतू शनिवारी नातीला फिरवत असलेल्या आजीच्याच गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत धूम स्टाईलने लांबविल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. त्यामुळे शहरात आता घरफोड्या, दुचाकी चोरट्यांनंतर धुम स्टाईलने सोन्याच्या पोता लांबविणार्‍या चोरटे सक्रीय झाले असल्याचे उघडकीस आले आहे.