अंजली दमानियांच्या गैरव्यवहारांवर धडाडणार माजी मंत्री एकनाथराव खडसेंची तोफ ?

0

भुसावळातील पत्रकार परीषदेत उलगडणार अनेक कंगोरे

भुसावळ (गणेश वाघ)- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर सातत्याने निरर्थक आरोप करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध अनेक बक्कळ पुरावे माजी मंत्री खडसे यांच्या हाती लागले असून या संदर्भात बुधवारी भुसावळात होणार्‍या पत्रकार परीषदेत ते गौप्यस्फोट करतील, अशी शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी दमानिया यांनी खडसेंवर भोसरी जमीन प्रकरणासह जावयाच्या महागड्या कार प्रकरणी आरोप केले होते तर भाजपासह खडसे परीवाराची बदनामी केल्याप्रकरणी दमानिया यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते.

दमानियांचे पितळ पडणार उघड ?
खडसे यांच्यासह परीवारावर बेछूट आरोप करणार्‍या अंजली दमानियांविरुद्ध खडसेंच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले असून बुधवारी दुपारी 12 वाजता भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्या ‘अटल’ या निवासस्थानी होणार्‍या पत्रकार परीषदेत ते याबाबत उलगडा करतील, अशी शक्यता खात्रीशीर सूत्रांनी व्यक्त केली. खडसेच्या हाती नेमके काय लागले आहे वा नेमका काय गौप्यस्फोट करतात? याकडे संबंध जिल्हावासीयांसह राजकीय समीक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

खडसेंचा लवकरच मंत्री मंडळात समावेश ?
तब्बल दोन वर्षांपासून मंत्री मंडळाबाहेर असलेल्या खडसे यांचा लवकरच मंत्री मंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खडसे काही बोलतात का? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे शिवाय ज्येष्ठ व अभ्यासू व आक्रमक चेहरा असलेल्या खडसे यांना मंत्री पद दिल्यास आगामी निवडणुका लक्षात घेता पक्षासाठी हितकारक ठरणार आहे. तसे झाल्यास जिल्ह्यात पुन्हा भाजपाची ताकद वाढण्यासदेखील मदत होणार आहे. बुधवारी दुपारी चार वाजता दिल्ली येथे कॅबिनेटची बैठक होत आहे तर आजच दुपारी खडसे दिल्लीकडे तातडीने रवाना होत आहे. खडसे गुरुवारी भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.