कल्पना ईनामदार यांचा मुक्ताईनगर न्यायालयात अर्ज ः न्यायालयाने तपास अधिकार्यांचे म्हणणे मागवले
मुक्ताईनगर- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया यांच्याविरुध्द दाखल केलेल्या खटल्यात महत्वपूर्ण साक्षीदार असल्याने या प्रकरणाची सत्यता बाहेर येण्यास आपली नार्को टेस्ट करा, असा विनंती अर्ज अण्णा हजारे समर्थक कल्पना इनामदार यांनी येथील न्यायालयात सादर केला आहे. यावर तपास अधिकारी व सरकारी वकिलांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, इनामदार यांच्या भूमिकेने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. नार्को टेस्ट झाल्यास खडसे यांना अडकावणार्यांचे पितळच उघडे पडणार असल्याने याबाबत पोलीस प्रशासन व सरकारी वकीलांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.
खडसे यांना अडकावण्यासाठी दमानियांनी रचला होता कट
कल्पना इनामदार यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परीरषदेत तत्कालीन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना अडकविण्यास अंजली दमानिया यांनी कट रचल्याच्या गौप्यस्फोट केला होता. याचा आधार घेत खडसेंनी मुक्ताईनगर पोलिसात अंजली दमानिया व अनिस दमानिया यांच्या विरुध्द 19 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात मी महत्त्वपूर्ण साक्षीदार असून अंजली दमानियांविरुद्धचे सीडी व अन्य पुरावे यापूर्वी मुंबई पोलिसांनी माझ्या घरी छापा टाकून जप्त केले आहेत तर यामागे अंजली दमानिया व त्यांच्या पतीचा हात यामुळे मुक्ताईनगरात दाखल गुन्ह्यात मी महत्वपूर्ण साक्षीदार आहे. वरील पुरावे माझ्याकडे नसल्याने या गुन्ह्याची सत्यता बाहेर येण्यासाठी आपली नार्को टेस्ट करण्यात यावी, असा अर्ज कल्पना इनामदार यांनी मुक्ताईनगर न्यायालयात बुधवारी दुपारी दाखल केला.
जे सत्य असेल ते जनतेसमोर यावे -माजी मंत्री खडसे
आपल्याला अडकवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याने या प्रकारामागे आणखी कुणाचा हात आहे ? हे सत्य जनतेसमोर येेणे गरजेचे आहे. कल्पना ईनामदार यांनी केलेल्या मागणीशी आपण सहमत आहोत, अशी भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केली.