अंजाळे घाटातील दरोड्याप्रकरणी भुसावळातील आरोपींना अटक

0

यावल- गतवर्षी अंजाळे घाटात एका सोने-चांदीच्या व्यावसायीकास सिनेस्टाईल लुटल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात यावल पोलिसांनी चार संशयीतांना ताब्यात घेतले आहे. त्यांना सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता चौघांना 4 ऑगष्टपर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शहरातील मेन रोडवर सराफा व्यवसायीक रमेश सदाशीव जाधव हे 11 नोव्हेंबर 2017 च्या रात्री जळगावहून सोने व चांदीचे दागिने घेवून यावलकडे येत असताना अंजाळे घाटात त्यांच्यावर रात्री नऊ वाजेेच्या सुमरास तीन दुचाकीवर आलेेल्या सहा अज्ञात दरोेडेेखोरांनी हल्ला केला होता. सराफाकडील एका बॅगेत असलेले 186. 5 गॅ्रम सोन्याचे दागिने व बिस्कीट आणि 112 गॅ्रम चांदीचे दागिने असा पाच लाख 91 हजार 500 रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवत जाधव यांना जबर मारहाण केली होती.

भुसावळातील गुन्हेगारांनी सराफास लुटल्याचा संशय
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना यावल पोलिसांनी विविध प्रकारे तपास सुरू ठेवला होता. काही दिवसांपूर्वी फैजपूर पोलिसांनी ट्रक चालकास अडवून रस्ता लूट केल्याप्रकरणी भावेश हेमंत फालक (19, रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड, भुसावळ) हर्षल रवींद्र पाटील (20, रा.आनंद नगर, भुसावळ), घनश्याम शिरीष चौधरी (23) व भरत मेघश्याम चौधरी (19, दोघं रा.पाडळसे, ता.यावल) या चौघांना अटक केली होती. आरोपींनी केलेली गुन्ह्याची पद्धत पाहता अंजाळे घाटातही याच आरोपींनी दरोडा टाकल्याचा यावल पोलिसांना संशय आहे. आरोपींना 25 जुलै रोजी यावल पोलिसांनी यावल न्यायालयातून ताब्यात घेतले होते व त्यानंतर पोलिस कस्टडी राखून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आरोपींची यावल तहसीलदारांसमोर ओळख परेड करण्यात आल्यानंतर त्यांची भुसावळ येथील उपकारागृहात रवानगी करण्यात आली होती. सोमवारी चौघा आरोपींना कारागृहातून पोलिसांनी तपास कामी ताब्यात घेत येथील प्रथम वर्ग न्यायाधीश डी.जी.जगताप यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता आरोपींना 4 ऑगस्ट पर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, हवालदार संजय तायडे, गणेश मनुरे, विकास सोनवणे करीत आहेत.