अंजाळे घाटात सराफावर दरोडा, दोन संशयीत ताब्यात

0

भुसावळ : भुसावळ-यावल रस्त्यावरील अंजाळे घाटात सराफा व्यावसायिकाला मारहाण करीत तीन दुचाकीवरून अज्ञात दरोडेखोरांनी पाच लाख 90 हजारांचे सोने लांबवले होते. या प्रकरणी सराफा व्यावसायीक रमेश सदाशीव जाधव (55) यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हाभरात पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या रमेश जाधव यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अपर अधीक्षकांची भेट
जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी आदींनी अंजाळे घाटात सराफाला ज्या जागेवर लूटण्यात आले त्या जागेची पाहणी केली.

जिल्हाभरात आरोपींचा शोध
शनिवारी रात्री घटना घडल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला होता तर भुसावळात नाकेबंदी करण्यात आली. अज्ञात दरोडेखोरांनी जळगाव येथूनच सराफावर पाळत ठेवल्याचा संशय आहे. अंजाळे घाटात रमेश जाधव येताच त्यांची बुलेट अडवून तीन दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी त्यांची सोने असलेली बॅग लांबवली. मराठी भाषिक दरोडेखोरांनी आपल्या वाहनाचा क्रमांक कळू नये यासाठी दुचाकींचे लाईटही बंद केल्याचे सांगण्यात आले.