भुसावळ। शहरातील उच्चशिक्षीत तरुणाने नोकरीच्या मागे न धावता गोसेवेचा संकल्प केला. व गाईंच्या सेवेतूनच रोजगार उपलब्ध करुन देण्याचा मानस धरुन यावल तालुक्यातील अंजाळे येथील नंदग्राम गोशाळेची स्थापना केली. याठिकाणी 1 हजार वृक्षारोपण करण्याचे नियोजन असून त्यापैकी 500 वृक्षांचे लागवड करण्यात आली आहे. यामध्ये कडूनिंब, अंबा, गुलमोहर, बदाम, चिकू, नारळ, अशोक अशा विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे.
बेरोजगारांना रोजगार देणार
शहरातील एमबीए उत्तीर्ण झालेल्या युवकाने गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता गाईंची सेवा करण्याचा संकल्प केला. यानुसार तापी नदीकाठालगत असलेल्या अंजाळे गावात दीड वर्षापूर्वी उजाळ माळरानावर गोशाळेची स्थापना करुन याठिकाणी शंभर गाईंसाठी सुविधा करण्यात येत आहे. याठिकाणी 11 एकर जमिनीवर शाळेची उभारणी करण्यात येत असून यातील दोन एकर जमिनीवर गाईंसाठी चारा लागवड केली जाणार आहे. याठिकाणी ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी निवासस्थानांची व्यवस्था करण्यात आली असून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच याठिकाणी एकूण 1 हजार वृक्षलागवड करण्याचे नियोजन असून आतापर्यंत पाचशे वृक्षलागवड करण्यात आली आहे.