अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची कोट्यावधींची संपत्ती होणार जप्त

0

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दाऊदची मुंबईतील कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे दाऊदची बहिण हसीना पारकर आणि आई अमिना बी यांच्या नावे असलेली दाऊदची संपत्तीही जप्त करण्याची परवानगी सरकारला देण्यात आली आहे. त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे.

दाऊदच्या संपत्तीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला हसीना पारकर आणि अमिना बी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. जप्तीच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी संधी देण्यात यावी, अशी विनंती हसीना पारकर यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. योग्य पद्धतीने नोटीस दिली नव्हती, त्यामुळे त्यावर अपीलात जाता आले नसल्याचे पारकर यांनी याचिकेत म्हटले होते. तर दाऊदने अवैध मार्गाने संपत्ती जमविली असल्याचा दावा सरकारी यंत्रणांनी केला होता. मुंबईत नागपाडा येथे दाऊद, त्याची बहिण हसीना आणि आई अमिना बी यांच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती असून सरकार लवकरच ही संपत्ती जप्त करणार आहे.

एसएएफईएमए कायद्यानुसार हसीना पारकर आणि त्यांची आई अमिना यांची संपत्ती जप्त करण्याच्या निर्णयावर 1998 मध्ये ट्रिब्युनल कोर्ट आणि 2012 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर संपत्ती जप्तीच्या नोटीशीला नियमानुसार 45 दिवसाच्या आत आव्हान देणे आवश्यक होतं. मात्र पारकर यांनी तसे न केल्याने त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे पारकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.