मुंबई । रजनीकांत यांचा आगमी सिनेमा मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झा यांच्या आयुष्यावर आधारित असणार असल्याची चर्चा आहे. मात्र, रजनीकांत आगामी सिनेमामुळे नाही तर भलत्याच वादामुळे सध्या चर्चेत आहेत. हाजी मस्तानचा दत्तक पुत्र असल्याचा दावा करणार्या सुंदर शेखर नावाच्या व्यक्तीने रजनीकांत यांना धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. शेखरने सुपरस्टार रजनीकांत यांना दिलेल्या नोटीसमध्ये त्याने म्हटले आहे की, ‘मस्तान यांना सिनेमात एक तस्कर किंवा डॉनच्या भूमिकेत दाखवण्याची चूक करू नये’.
तसेच धमकी देणारा व्हिडीओ मेसेजही त्याने रजनीकांत यांना पाठवला आहे. या व्हिडीओमध्ये शेखरने म्हटले आहे की, मिस्टर रजनीकांत, हाजी मस्तानच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा तुम्ही घेतलेला निर्णय ही चांगली बाब आहे. मात्र लक्षात ठेवा तुमच्या आगामी सिनेमात हाजी मस्तानची प्रतिमा खलनायकाच्या स्वरुपात दाखवण्यात आली तर तुम्हाला आणि तुमच्या टीमला याची भरपाई द्यावी लागेल. आमची माणसे तुम्हाला सोडणार नाहीत, ती तुमच्यासमोर काही-न्-काही समस्या निर्माण करतील.
धमकी देताना शेखरने पुढे असेही म्हटले आहे की, ‘हाजी मस्तानला तस्कर आणि अंडरवर्ल्ड डॉनच्या रुपात सिनेमात दाखवणे ही बाब आमच्यासाठी अपमानकारक आहे व ही ते आम्हाला मान्यदेखील नाही. हाजी मस्तानला तस्करी किंवा अंडरवर्ल्डमधील कोणत्याही कारवायांमुळे कुठल्याही न्यायालयाने कधीही दोषी ठरवलेले नाही’.