अंडर ग्राउंडचे काम जानेवारीत पूर्ण : आमदार भेगडे

0
पुलाच्या कामाची केली पहाणी
तळेगाव दाभाडे : तळेगावगाव भाग व स्टेशनला जोडणार्‍या अंडर ग्राउंड पुलाचे काम जानेवारी अखेर पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी लोकार्पण करणार असल्याची माहिती आमदार बाळा भेगडे यांनी पुलाचे कामाची पाहणी करताना दिली. या पुलाचे काम करण्यासाठी शुक्रवारी तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. तसेच शनिवारी तीन तासांचा मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणार्‍या अप लाईनवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार बाळा भेगडे, किशोर आवारे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, संदीप काकडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, भाजपचे जेष्ठ नेते गणेश भेगडे, शोभा भेगडे, संध्या भेगडे, सभापती गुलाब म्हाळसकर, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, अजय भेगडे, गानेशाप्पा भेगडे आदी उपस्थित होते.
हिंदमाता पुल असे नाव देणार
यावेळी आमदार बाळा भेगडे म्हणाले की, तळेगावच्या स्टेशन चौकामधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा भुयारी पूल अत्यंत फायदेशीर होईल. दिवसेंदिवस सेकंड होम म्हणून तळेगावचा नावलौकिक होत आहे. याठिकाणी कामगार, शालेय विद्यार्थी, चाकण कडे जाणारे नागरिक यांना जवळचा रस्ता म्हणून चांगली सोय होणार आहे. या पुलाला हिंदमाता रेल्वे भुयारी पूल असे नाव देण्यात येईल. त्याप्रमाणे नगरपालिका प्रशासन ठराव करून मंजुरी देईल. या पुलाचे काम सुमारे 11 कोटी रुपये खर्चाचे असून तळेगाव दाभाडे नगर परिषद व पुणे जिल्हानियोजन समितीच्या माध्यमातून ते पूर्ण होणार आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर तळेगावच्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या दूर होईल, असे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी यावेळी सांगितले.