पुणे । शहराच्या मध्यवस्तीच्या अंतिम विकास आराखड्याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत यावर निर्णय अपेक्षित आहे. शहर विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन त्याचा अहवालही शासनाकडे सादर झाला आहे. आता अंतिम निर्णय होईल, असे अधिकार्यांनी सांगितले. जुन्या हद्दीतील रस्ता रुंदीची आरक्षणे उठविणे आणि नवीन आरक्षणे टाकणे असे महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याने जागा-मालक, बिल्डर, भाडेकरू या घटकांचे लक्ष आहे. जुन्या मिळकती विकसित करण्याचे काम काही वर्षे ठप्प आहे.अंतिम आराखडा मंजूर झाल्यास ही प्रकरणेही मार्गी लागतील. नारायण पेठेत लाकडी पूल ते नवा पूल या पट्ट्यातील 105 मिळकतधारक रस्ता रुंदी, पूररेषा निश्चित होत नसल्याने वैतागले आहेत. नदीकाठचा रस्ता आरक्षण आराखड्यात उडविण्यात आले. पण निर्णय अंतिम नाही. त्यातच निळी पूररेषा आणि लाल पूररेषा याबाबत काय ठरले याविषयी येथील नागरिक अंधारात आहेत.येथील इमारती दुरुस्त करणे, नव्याने बांधणे असे प्रस्ताव मंजुरीअभावी अडकले आहेत. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी चार धरणे बांधली आहेत, त्यामुळे पुराचे प्रमाण कमी झाले आहे. हे लक्षात घेता रेषा निश्चितीचा घोळ घालणे अनावश्यक आहे, असे मत माजी नगरसेवक गोपाल तिवारी यांनी व्यक्त केले.