अंतुर्लीत जुगाराचा डाव उधळला ; 28 जुगारी जाळ्यात

0

53 हजारांच्या रोकडसह 24 दुचाकी, तीन रीक्षा जप्त ; सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांची धडाकेबाज कारवाई

भुसावळ- मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्लीनजीक जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाल्यानंतर त्यांनी टाकलेल्या धाडीत 28 जुगार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर 53 हजारांच्या रोकडसह 24 दुचाकी, तीन रीक्षा जप्त करण्यात आल्या. सोमवारी सायंकाळी झालेल्या या कारवाईप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

डंपरमध्ये जावून पोलिसांनी टाकली धाड
मध्यप्रदेशातील शेवटच्या टोकावर व अंतुर्ली गावापासून काही अंतरावर असलेल्या एका केळीच्या शेतात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांना कारवाईच्या सूचना केल्या. पोलीस वाहन नेल्यानंतर आरोपी पसार होण्याची भीती असल्याने साध्या वेशातील पोलिसांनी डंपरमध्ये बसून प्रवास केला त्यामुळे आरोपींना धाड पडणार असल्याची जराशीही कुणकुण लागली नाही मात्र अचानक आलेल्या जमावामुळे काही जुगार्‍यांना रेड पडल्याचे कळाल्याने त्यांनी धूम ठोकली तर घटनास्थळावरून 28 जुगार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या शिवाय तीन अ‍ॅटो रीक्षांसह 24 दुचाकी, 53 हजार 400 रुपयांची रोकड व जुगाराची साधन जप्त करण्यात आली.

अट्टल जुगार्‍यांविरुद्ध गुन्हा
घटनास्थळावरून नवाबखान सरदारखान उर्फ बालूभाई (अंतुर्ली) यास अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार दीप ससाणे (मुक्ताईनगर), रामू हिरोळे (मुक्ताईनगर), अशोक, रमेश माळी (शहापूर, मध्यप्रदेश) यांच्यासह 28 जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहा.अधीक्षक नीलोत्पल म्हणाले.

यांचा कारवाईत सहभाग
सहा.अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज अहिरे, दिलीप कोळी, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, ठाकूर, शहर पोलीस ठाण्याचे समाधान पाटील, जुबेर शेख, मोहन लाड तसेच आरसीपी प्लाटूनच्या 13 कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.