अंतुर्लीत दागिने सुरक्षित ठेवत दोन लाखांच्या रोकडवर डल्ला

0

तक्रारदार पोलिसात जाताच चोरट्यांना उपरती : दाराबाहेर ठेवली दागिण्यांची पिशवी

भुसावळ (गणेश वाघ)- चोरीसह घरफोड्यांमध्ये लाखोंचा मुद्देमाल चोरीस गेल्यानंतर गुन्ह्याचा तपास लागण्याच्या घटना तशा दुर्मीळच मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्लीत याच्या विपरीत घटना घडली. चोरट्यांनी दोन लाखांच्या रोकडसह तब्बल आठ लाख 60 हजारांचे दागिने लांबवल्यानंतर गावात खळबळ उडाली. तक्रारदार मुक्ताईनगर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजताच अज्ञात चोरट्यांना उपरती झाली व त्यांनी चक्क सहा लाख 60 हजार रुपयांचे चोरलेल्या दागिण्यांची लांबवलेली पिशवी पुन्हा तक्रारदाराच्या घराबाहेर आणून ठेवली. चोरट्यांना झालेल्या उपरतीमुळे पोलिसही या प्रकाराने चक्रावले असून दोन लाखांच्या रोकडवर मात्र चोरट्यांनी डल्ला मारला आहे. प्रथमच अशा पद्धत्तीच्या झालेल्या चोरीमुळे गुंता वाढला असून पोलिस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कॉटमधून लांबवले दागिने व रोकड
अंतुर्लीतील पाटीलवाड्यात फियार्र्दी उषाबाई सुधाकर पाटील व त्यांचे पती सुधाकर पाटील राहतात. त्यांनी घरातील बैठक हॉलमधील कॉटमध्ये दोन लाखांच्या रोकडसह सहा लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिने ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान केव्हातरी हे दागिने लांबवले. शनिवारी पाटील कुटुंबियांना पैशांची गरज भासल्याने त्यांनी कॉट उघडला असता त्यात रोकड व दागिने ठेवलेली पिशवी न आढळल्याने त्यांनी मुक्ताईनगर पोलिसात धाव घेतली. अज्ञात चोरट्यांना प्रकरण अंगाशी येईल याची धास्ती वाटल्याने त्यांनी चोरलेली दागिण्यांची पिशवी पाटील यांच्या व्हरांड्यात आणून टांगली. तक्रारदार घरी परतल्यानंतर त्यांना दागिण्यांची पिशवी मिळाल्याने मोठा आनंद झाला असलातरी चोरट्यांनी दोन लाखांच्या रोकडवर मात्र डल्ला मारला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सुभाष नेवे व पोलीस निरीक्षक अशोक कडलग हे सहकार्‍यांसह हजर झाले असून त्यांच्याकडून झाल्या प्रकाराची माहिती घेण्याचे काम सुरू होते.