नवी दिल्ली- सरकारने अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रोज आइसलॅण्ड, नील आइसलॅण्ड आणि हेवलॉक आइसलॅण्ड या तीन बेटांची नावे बदलून ती नेताजी सुभाष चंद्र बोस आइसलॅण्ड, शहीद द्विप आणि स्वराज द्विप असे नामकरण करण्यात येणार आहे.
सुभाष चंद्रबोस यांनी पोर्ट ब्लेयर येथे भारतीय तिरंगा फडकावल्याच्या अमृतमोहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे नामांतरण करण्याचा सरकारचा विचार आहे. बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्लेयर येथे भारताचा झेंडा फडकवला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडविरुद्ध लढणाऱ्या जपानने अंदमान निकोबार बेटांचा परिसर ताब्यात घेतल्यानंतर नेताजींची हे ध्वजारोहण केले होते. त्यावेळेस त्यांनी अंदमान निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज द्विप अशी नावं द्यावीत अशी मागणी केल्याचे सांगितले जाते.
१८५७ च्या उठावामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांविरुद्ध लढलेल्या व्यक्तीच्या नावाने हे बेट ओळखले जाते हे लज्जास्पद असल्याचे मत एल.ए. गणेशन यांनी व्यक्त केले होते. ब्रिटिश अधिकारी हेन्री हेवलॉक यांच्या नावावरुन बेटाचे नामकरण करण्यात आले आहे. हे अंदमान निकोबार बेट समुहातील सर्वात मोठे बेट आहे. लवकरच या बेटाचे नाव स्वराज द्विप असं करण्यात येणार आहे.