अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने टळली फसवणूक

0

शहादा। सोबत नंदीबैल आणून शहादा शहरातील विजय नगर परिसरात पुन्हा एका टोळीने भीती घालवून भविष्य सांगण्याच्या निमित्ताने एका कुटुंबाची सहा हजार रुपयात फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. एका अपत्यहीन महिलेला कालसर्पयोगाची व शनिची भीती दाखवीत फसविण्याचा प्रयत्न केला. वेळीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी टोळीचा भांडाफोड करून लोकांना जागृत केले आणि माफी मागत,आपली चूक झाली म्हणत टोळीने पलायन केले.

चार ते पाच जणांची टोळी सक्रीय
शहादा शहरातील विजयनगर परिसरात सोबत नंदीबैल घेऊन पुन्हा चार ते पाच जणांच्या टोळीने प्रवेश केला. नंदीबैलाचा खेळ न दाखविता पुन्हा पाणी पिण्याच्या बहाण्याने एका कुटुंबात प्रवेश केला. घरात केवळ तरुण मुलगी व तिचा भाऊच होता. मुलगी सतत आजारी असते. कारण तीला शनीची वक्र दृष्टी आहे. तीचे लग्न जुळणार नाही अशी भिती घातली. सहा हजार रुपयांची मागणी केली. विधी करतो आणि सर्व प्रश्न सुटतील असे सांगितले.

टोळीने केले पलायन: टोळीला गाठून त्यावर प्रश्नाची सरबत्ती करीत तुम्हालाच तुमचे स्वतःचे भविष्य कसे माहिती नाही. जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती देताच टोळीने शरणागती पत्करली. यापुढे असे भविष्य कथन करणार नाही. भीती घालणार नाही असे म्हणत पलायन केले. ही टोळी देखील बीड जिल्ह्यातील कडा सहकारी साखर कारखाना, आष्टी तालुक्यातील जळगाव या गावाची होती. यात अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे,युवा कार्यवाहक विपुल रोकडे यांचा सहभाग होता.अंनिसच्या या कामाबाबत नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.

अनिसंच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाळत
धान्य घेऊन नंदीबैलाची पूजा करण्यासाठी आलेल्या दुसर्‍या महिलेस तुम्ही नवर्‍याला आपल्या मुठीत ठेवले आहे. पण तुम्ही मात्र नवर्‍याच्या ताब्यात नाहीत.तुमचा मोठा मुलगा चांगला मात्र लहान तुम्हाला हिशोब विचारतो.असे काही ठोकताळे सांगून आपल्यात दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करू लागला. या सर्व घटनेकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली.टोळी शिरलेल्या घरात जाऊन केलेल्या फसवणुकीची माहिती घेतली.