अंधांसाठी ‘कुबेर’ दीपस्तंभ झाला

0

पुण्यातील प्रशांत कुलकर्णी हे इलेक्ट्रीकल कंत्राटदार आहेत. फेसबुकवर कुलकर्ण्यांचा प्रशांत या नावाने प्रसिध्द आहेत. सामाजिक चळवळीत अग्रणी असणारे प्रशांत कुलकर्णी हे ज्या-ज्या वेळेस अंध विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अंध विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात परीक्षेच्या वेळी अभ्यास साहित्य उपलब्ध नसणे, प्रवासात होणारी गैरसोय, लेखनिक न मिळणे आदी समस्या नित्याच्याच आहेत. या समस्यांना सोशल मीडीयातून मांडण्यापेक्षा आपण स्वताःच या समस्यांचे उत्तर होवू या भावनेतून प्रशांत कुलकर्णी हयांनी स्वताःच एका अंध विद्यार्थ्यांसाठी रायटर व्हायचा निर्णय घेतला. पुणे विद्यापीठात शोध घेवून रामबाबू नामक अंध विद्यार्थ्याचे एम ए मराठीच्या पेपरला लेखनिक झाले. लेखनिक मिळतांना मारामार सुरु असतांना अचानक देवदूतासारखे प्रशांत कुलकर्णी मदतीला आल्याने रामबाबूंच्या डोळ्यात पाणी आले. अंध डोळ्यात उजेडाची तिरीप दिसली. याबाबत आपल अनुभव व्यक्त करतांना कुलकर्णी म्हणाले की, ‘’ फक्त एकदा डोळ्याला पट्टी बांधून स्वतःच्याच घरात अर्धा तास वावरून बघा. किती अस्वस्थ होईल. आणि ही मंडळी स्वतःच्या हिमतीवर बिनदिक्कत परिस्थितिला सामोरे जातात, स्वतः लढतात, काहीतरी करू पाहतात, आपण पेपर लिहून त्यांना हातभार लावून त्यांच्या प्रगतिपथावर सहभागी होऊ शकतो. एवढे तर नक्कीच करू शकतो.

आणि हे केल्याचे मार्च एंडींगच्या उन्हाळ्यात गारवा देणारे समाधान मला लाभले. प्रशांत कुलकर्णी एव्हढ करुन थांबले नाहीत त्यांनी ते कशा पध्दतीने रामबाबूंचे लेखनिक झालेत यावर सविस्तर फेसबुक व फेसबुकवरील कुबेर समुहात पोस्ट टाकली. अंध विद्यार्थ्यांना लेखणिक होण्यासाठी पुढे याव अस आवाहन केले. प्रशांत कुलकर्णी यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. कुबेर समुहातील कॉटमॅक कंपनीत इंजिनिअर असलेल्या आनंद कुलकर्णी यांनीही पुढील धुरा खाद्यांवर घेत माधव बिरादार या अंध विद्यार्थ्याला पेपर लिहायला मदत केली. आनंदनेही त्याचा अनुभव कुबेर समुहात शेअर केला. त्या नंतर कुबेर समुहातील उज्वला सुधाकर, अनिरुध्द देशींगकर, रुपाली देशींगकर, हर्षद खुपसे,विजय कोठाळे,मानसी शहा आदींनी पुढाकार घेत अंध विद्यार्थ्यांचे पेपर लिहले. समाजात अंधासाठी डोळस व्हा असा आदर्श निमार्ण केला. पुढील काळात प्रशांत व आनंदचे किमान 50 अंध विद्यार्थ्यांना लेखनिक मिळवून देण्याचे उद्दीष्ट आहे. फेसबुकवरील कुबेर समुहाने आतापर्यंत वेगवेगळे व अनोखे उपक्रम राबवले आहेत. त्यात गेल्या उन्हाळ्यात दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्हयातील जलसंधारणाची काम, गरीब उपेक्षितांना मदत यांसारखे अनेक उपक्रम आहेत. नुकतेच कुबेर समूह रजिष्टर नोंदणीकृत झाला असून कुबेर समुहामार्फत इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा काढण्याचा मानस कुबेर समुह प्रमुख संतोष लहामगे यांनी बोलून दाखवला आहे.
संजय सपकाळे