चिखली येथे राहणार्या सीमा खरादचे यश
पिंपरी-चिंचवड : शिकण्याची जिद्द, वक्तृत्वाची आवड आणि कष्ट करण्याची तयारी असताना केवळ अंधत्व आल्यामुळे या सर्वांवर काही प्रमाणात बंधने आली. पण अंधत्वाला कुरवाळत न बसता, जिद्दीने अभ्यास करत तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल 90 टक्के गुण मिळविले. तिच्यामध्ये असलेल्या बुद्धीचातुर्यापुढे अंधत्वानेही हात टेकले. ही कहाणी आहे, चिखली येथे राहणार्या सीमा खरादची.
जन्मांध; ब्रेल लिपीतून अभ्यास
सीमा जन्मापासूनच अंध आहे. सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या सीमाने ब्रेल लिपीतून अभ्यास करून घवघवीत यश मिळविले. जागृती अंध मुलींची शाळा, आळंदी देवाची या शाळेच्या माध्यमातून सीमाने आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता दहावीला प्रवेश घेतला. सीमाचे वडील बळीराम खराद तिला दररोज दुचाकीवरून शाळेत सोडत आणि आणत असत. चिखलीमध्ये फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळत त्यांना देखील सीमाएवढीच कसरत करावी लागत असे. ब्रेल लिपीतून दहावीची पुस्तके खरेदी केली. ऑडिओ साहित्य उपलब्ध केले. त्याव्यतिरिक्त आई-वडील नियमित तिला अभ्यासक्रमाची पुस्तके वाचून दाखवत असत.
घरातल्यांनी अभ्यास दाखवला वाचून
दहावीसाठी सीमा एवढेच तिच्या घरच्यांनी देखील कष्ट केले. त्यामुळेच तिला 90 टक्क्यांचा आकडा गाठणं शक्य झालं. पण सीमाला या प्रवासात काही अडचणी देखील आल्या. सीमा म्हणते, ब्रेल लिपीतील साहित्य फार थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच हे साहित्य नियमित पुस्तकांपेक्षा काही प्रमाणात महाग आहे. त्यामुळे ते सर्वांनाच खरेदी करता येत नाही. मला देखील ब्रेल लिपीतून सर्व साहित्य उपलब्ध झाले नाही. जे साहित्य ब्रेल लिपीतून नसेल त्याची ऑडिओ कॅसेट मिळते का? याची चौकशी करावी लागत असे. कॅसेटही काही प्रमाणातच मिळतात. त्यामुळे घरच्यांनी मला अभ्यासक्रमातील बराच भाग वाचून दाखवला. त्या वाचनाची कित्येक आवर्तने झाली.
इंग्रजी भाषेतून कला शाखेची पदवी घेणार
आई, वडील, चुलते यांच्या मदतीने अभ्यास केला. पण परीक्षेसाठी योग्य रायटर मिळण्यासाठीसुद्धा बरीच कसरत करावी लागली. मला 95 टक्के गुण मिळण्याची अपेक्षा होती, मात्र योग्य रायटरच्या कमतरतेमुळे ती अपेक्षा पूर्ण झाली नाही, अशी खंतही सीमाने व्यक्त केली. घरच्यांसोबत दोन्ही शाळांमधील शिक्षकांनी देखील खूप मदत केली. दहावीनंतर फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी भाषेतून कला शाखेला प्रवेश घ्यायचा असून पदवीनंतर यूपीएससीची परीक्षा देण्याचे सीमाचे ध्येय आहे.