अंध विद्यार्थ्यावर केली मोफत शस्त्रक्रिया

0

धनश्री रुग्णालयाने जपले सामाजिक भान

पिंपरी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अंध विद्यार्थी अक्षय पाटीलच्या खांद्यांवर धनश्री रुग्णालयाचे संचालक अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अपूर्व पटवर्धन यांनी मोफत शस्त्रक्रिया केली. अक्षय हा क्रिकेट खेळत असताना त्याच्या उजव्या खांद्यावर पडला. पडल्यानंतर त्याचा उजव्या खांद्यातून हात निखळला. अक्षयला खूप त्रास व वेदना झाल्या. अशा स्थितीत तो अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अपूर्व पटवर्धन यांच्याकडे आला व हात बसवून घेतला. नंतरही त्याचा वारंवार उजवा हात खांद्यातून निखळत होता.

डॉ. अपूर्व पटवर्धन यांनी अक्षयला तपासले. वारंवार उजवा निखळून खूप त्रास व वेदना होतात असे त्याने सांगितले. त्याच्या रोजच्या कामासाठी व हाताच्या हालचालीवर खूप मर्यादा आल्याचे अक्षयने डॉक्टरांना सांगितले. शिंकताना सुद्धा त्याचा उजवा खांद्यातून हात निखळत होता. अक्षयची बिकट परिस्थिती लक्षात आल्यावर स्वतः डॉ पटवर्धनांनी सर्व उपचार (अंदाजे दीड लाख ) पूर्णपणे मोफत करतो असे स्वतःहून सांगितले. अक्षयला धनश्री हॉस्पिटलमधील डॉ. राजीव पटवर्धन, डॉ. सलोनी कुलकर्णी यांनी मोफत उपचाराचा विश्‍वास दिला.

बिकट परिस्थिती
डॉ. अपूर्व पटवर्धनांनी अक्षयची शस्रक्रिया पूर्णपणे मोफत करतो असे स्वतःहून सांगितले. ह्या उपचारासाठी लागणारे इम्प्लांट, स्क्रु व इतर औषधे याचाच खर्च रु. 60,000 एवढा आहे. ह्या सर्व उपचाराचा इम्प्लांट, औषधे आणि रुग्णालयातील वास्तव्याचा खर्च स्वतः डॉ. पटवर्धनांनी केला आहे. अक्षय पाटील हा अंध विद्यार्थी आहे. त्याचे वडील हयात नाहीत. त्याच्या घरी कमावते असे कोणीच नाही. अक्षयच्या घरी आई व तीन बहिणी आहेत. घराची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. तो शिक्षणासाठी व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चिंचवडमधील एका अंध शाळेत आला आहे. रोज करावयाचे काम करण्यासाठी त्याला ऑपरेशन करणे गरजेचे झाले होते. अन्यथा त्याच्या कामावर व उत्पनावर परिणाम झाला असता.

अक्षयवर दि. 23 मे पासून उपचाराला सुरुवात झाली आहे. दुसर्‍या दिवशी दि. 24 मे रोजी त्याच्यावर शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आली आहे. डॉ. अतुल गांधी, डॉ. सलोनी, गौतम त्र्यंबके आणि स्वतः डॉ. अपूर्व पटवर्धन यांनी ही शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. अक्षय व नातेवाईक व चिंचवडमधील त्याच्या संस्थेने धनश्री हॉस्पिटल, डॉ. पटवर्धन यांचे आभार मानले आहेत.