बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांची माहिती
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता,पदाधिकारी यांच्या प्रशिक्षण शिबीराचे रविवार दि.3 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथे अनिकेत मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने तज्ञ प्रशिक्षक व नेते हे उपस्थित राहून काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहेत. काँग्रेस पक्षाचे संघटन, कार्यकर्ते यांच्या मध्ये चैतन्य निर्माण होवून शिस्तबद्ध व मजबूत एकसंघ संघटन निर्मितीसाठी हे प्रशिक्षण शिबीर महत्वाचे ठरणार असल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अंबाजोगाई येथे काँग्रेस कार्यकर्ता व पदाधिकार्यांचे एक दिवसीय पुर्णवेळ प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात तज्ञ प्रशिक्षक व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर नेते कार्यकर्त्यांना प्रबोधनपर भाषणे, प्रोजेक्टरद्वारे माहिती देवून एकत्रित चर्चा आणि संवाद अशा स्वरूपात कार्यकर्त्यांची मते आजमावून घेणार आहेत.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचे हे प्रशिक्षण शिबीर अत्यंत महत्वपुर्ण असून प्रशिक्षणास काँग्रेस कमिटीचे सचिव तथा मराठवाडा विभागाचे सहप्रभारी संपतकुमार, काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विभागातील नेते, जिल्हाप्रभारी हे उपस्थित राहणार आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा प्रशिक्षण प्रमुख आ. अॅड. रामहरी रूपनवर, जिल्हाप्रभारी प्रा.सत्संग मुंडे यांनी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीस कळविले आहे. त्यानूसार जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सदरील प्रशिक्षण शिबीरास काँग्रेस कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.