प्रा.डॉ.किशोर सानप, प्रा.डॉ.अशोक चौसाळकर, प्रा.डॉ.आनंद पाटील, डॉ.बी.बी.ठोंबरे यांची लाभणार उपस्थिती
दत्तप्रसाद रानडे व अंजली मराठे यांच्या स्वरांनी मैफल रंगणार
अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ३४ वे वर्ष असून तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, बाल आनंद मेळावा, चित्रकला स्पर्धा, उर्दू व हिंदी गझल गायन, शेतकरी परिषद, पुरस्कार वितरण, समारोप समारंभ, शास्त्रीय गायन व अंबाजोगाईच्या हौशी छायाचित्रकारांचे पक्षी, पर्यावरण, निसर्ग व प्राण्याच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे यावर्षी आकर्षण असणार आहे.
अंबाजोगाईत गेल्या ३३ वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने वैविध्यपुर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात. अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी ३४ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर रविवार, सोमवार व मंगळवार असा संपन्न होणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
उद्घाटन व कवी संमेलन
रविवार, दि.२५ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वा. या समारोहाचे उद्घाटन ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्रा.डॉ. किशोर सानप, नागपूर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असुन अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व गांधी अध्यासन केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्रा.डॉ.अशोक चौसाळकर हे उपस्थित राहणार आहेत.
रात्रौ ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील ज्येष्ठ कवी डॉ.मिर्झा रफी बेग हे राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन ठाणे येथील कवी किरण येले करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी सर्वश्री प्रा.प्रशांत मोरे-कल्याण, शामसुंदर सोन्नर-परळी, पवन नालट-अमरावती, एजाज शेख-भुसावळ, अंकुश आरेकर-मोहोळ व संगीता कदम-झिंजुरके-बीड यांचा सहभाग असणार आहे.
चित्रकला व बालआनंद मेळावा
सोमवार, दि.२६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ८.०० वा. शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शहरातील विविध विद्यालयातील हजारो विद्यार्थी यात सहभागी होतील. स्पर्धेचा निकाल सकाळी १०.०० वा.घोषित केला जाईल. त्यात विजेत्यांना बक्षिस वितरण केले जाईल व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच बाल आनंद मेळावाही आयोजित केला असून त्यात बाल साहित्यिक व स्वा.रा.ती.विद्यापीठ नांदेड येथील मराठीचे प्राध्यापक डॉ.पृथ्वीराज तौर हे मार्गदर्शन करणार आहेत.
‘सबरंग’ हिंदी व उर्दू गझल गायन कार्यक्रम
रात्रौ ८.०० वा.सुप्रसिद्ध गायक दत्तप्रसाद रानडे व अंजली मराठे यांचा ‘सबरंग’ हा हिंदी व उर्दू गझल गायनाचा बहारदार कार्यक्रमाची संगीतमय मैफल आयोजित करण्यात आली आहे. यात हिंदी, उर्दू भाषेतील सुप्रसिध्द गझलकारांच्या गझल रचनांचे सादरीकरण होणार आहे. यात त्यांना निनाद सोलापूरकर-सिंथेसायझर, तबला-अमोद कुलकर्णी यांची साथ लाभणार असून स्वानंद जावडेकर यांचे तंत्र निदेशनाचे सहकार्य लाभले आहे.
शेतकरी परिषद
मंगळवार, दि.२७ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वा.शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून तत्पुर्वी पीकस्पर्धा व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर शेतकर्यांना मार्गदर्शनपर भाषणे होतील. त्यात धैर्यशिल सोळंके-प्रगतशील शेतकरी माजलगाव हे सिताफळ लागवड, नियोजन व बाजारपेठ, प्रा.डॉ.गोविंदराव मुंडे-प्रभारी प्रमुख, सिताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई हे फळबागांची लागवड व व्यवस्थापन या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी रांजणी ता.कळंब येथील शेती उद्योजक व नॅचरल शुगरचे संस्थापक डॉ.बी.बी.ठोंबरे यांचे शेती व शेती उद्योगातील अनुभव कथन होणार आहे.
समारोप समारंभ व यशवंतराव चव्हाण स्मृती सन्मान २०१८
याच दिवशी सायं. ५.३० वा. समारोप समारंभ होत असून कोल्हापूर येथील सुप्रसिध्द साहित्यिक तथा संशोधक प्रा.डॉ.आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा (क्रिडा) या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सन्मान करण्यात येणार असून त्यात रांजणी, ता.कळंब येथील शेती उद्योजक व शेतकर्यांचे प्रेरक कृषीभूषण डॉ.बी.बी.ठोंबरे यांना कृषी, परळीचे प्रा.मधु जामकर यांना साहित्य, अंबाजोगाईच्या सध्या जयसिंगपुर येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती राजकुंवर आठवले यांना संगीत, तर भारतीय व जागतीक पातळीवर कुस्ती या क्षेत्रात सुवर्णपदक प्राप्त युवा खेळाडू राहुल आवारे पाटोदा यांना सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, रोख पाच हजार रूपये, शाल, पुष्पगुच्छ असे आहे.
शास्त्रीय संगीतसभा
रात्रौ ठिक ८.३० वा.शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत कलकत्ता येथील सतार वादक सुप्रतिक सेनगुप्ता यांचे सतार वादन सादर होणार आहे, साथसंगतीत त्यांना तबल्यावर मयंक बेडेकर-गोवा हे साथ करणार आहेत. तसेच गोवा येथील सुप्रसिध्द शास्त्रीय गायीका डॉ.शिल्पा डुबळे-परब यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना तबल्यावर तुळशीदास परब व सुप्रसिध्द संवादिनी वादक राया कोरगावकर हे साथ करणार आहेत.
यावर्षी हा समारोह महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार असून यात चित्रकला प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, ग्रंथ विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अंबाजोगाई येथील हौशी छायाचित्रकार प्रा.अभिजीत लोहिया, डॉ.शुभदा लोहिया, मुन्ना सोमानी, विजय लोखंडे, शंतनु सोमवंशी, सुशांत सोमवंशी, डॉ.अविनाश मुंडे, निरज गौड व डॉ.उदय जोशी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन हे आकर्षण असणार आहे. अंबाजोगाई परिसरातील प्राणी, पक्षी, निसर्ग, नद्या यांचे ‘भोवताल’ या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे.
कै.भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक झालेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी तिन्ही दिवस उपस्थित राहुन सहकार्य करावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सचिव दगडू लोमटे, भगवानरावजी शिंदे बप्पा, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, प्रा.सुधीर वैद्य, सतिश लोमटे यांनी व इतर पदाधिकारी यांनी केले आहे.