मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेल्या दिरंगाई व त्रुटीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गोंधळलेली स्थिती कारणीभूत असून यासाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांचे देखील कौंसलिंग करण्याची आवश्यकता असल्याचे खळबळजनक विधान राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केले. अकरावी प्रवेशावरून झालेल्या गोंधळाबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मेरिटमध्ये येऊनही ऑनलाइन प्रवेश घेताना झालेल्या चुकीमुळे प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच प्रक्रियेचे काम पाहणार्या् न्यासा एशिया प्रायव्हेट लिमिटेड संस्थेसोबत झालेल्या करारनाम्यातील अटी व शर्ती व निविदेतील तरतुदी विचारात घेवून संस्थेवर दंडात्मक कारवाईची सुरुवात करण्यात आली आहे, असे तावडे यांनी सांगितले.
एकच लॉगिन देणार
एडमिशन घेणार्याच विद्यार्थ्याला त्याच्या मनातील कोर्सला प्रवेश न घेता गोंधळून टाकले जाते. यामुळे एकतर प्रवेशाला उशीर होतो आणि प्रवेश घेणार्या इतर विद्यार्थ्यांचेही नुकसान होते, यामुळे पालकांचे कौंसलिंग करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. राज्यातील 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईसह सात विभागीय केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. मुंबई, पुणे येथील विद्यार्थी संख्या मोठया प्रमाणावर आहे. मुंबईत 2 लाख 68 हजार एवढे विद्यार्थी आहेत. त्यामुळे एकाचवेळी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेत 8 लाख जणांच्या लॉगईन करण्याची क्षमता असणार्याे सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या तुलनेत प्रवेशासाठी 15 लाख लोकांनी लॉगईन केले त्यामुळे या सर्व्हरची क्षमता वाढविण्यासाठी सर्व्हर ट्रासंफर करताना अडचणी उद्भवल्या होत्या, ही क्षमता वाढविन्यासोबत एकच लॉगीन देण्याची व्यवस्था पुढील वर्षांपासून केली जाईल असे तावडे यांनी सांगितले.
तुकड्या वाढविणार
242 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरताना विहीत पध्दतीचा अवलंब न केल्याने चूक झाली होती, मात्र या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असे सांगितले. तसेच 11 वी प्रवेशासाठी महाविद्यालयांनी मागणी केल्यानूसार वाढीव तुकडयांना मान्यता देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक महाविद्यालयात प्रवेशाला प्राधान्य द्या
यावेळी भाजपसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी खासकरून मुंबईत विद्यार्थ्यांना त्याच्या घरापासून दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिकतेचा निकष ठरवून स्थानिक महाविद्यालयात स्थानिक विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा अशी मागणी केली. यावर उत्तर देताना तावडे यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे विद्यार्थ्याची गुणवत्ता व त्या विद्यार्थ्यांने दिलेल्या महाविद्यालयाचा पसंतीक्रम यावर अवलंबून आहे. या ऑनलाईन प्रक्रियेमूळे विद्यार्थ्यांना लांबच्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो ही व्यावहारिक अडचण असल्याचे सांगितले. तरीही यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक आमदारांची बैठक बोलावून चर्चा करू असे त्यांनी सांगितले..