अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू

0

पुणे । केंद्रीय पद्धतीने होणार्‍या इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग 2 विद्यार्थ्यांना बुधवारपासून भरता येणार आहे. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 5 जुलै 2018 रोजी जाहीर करण्यात येईल. चौथ्या फेरीची शेवटची गुणवत्ता यादी 29 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध होईल. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळअखेरपर्यंत 69 हजार 425 विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अर्जाचा पहिला भाग भरला होता.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दुसजया भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरायचा आहे. बुधवारपासून या अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. अर्जाचे भाग 1 व भाग 2 भरून ते ऑनलाईन जमा करण्यासाठी 25 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अकरावी अर्जाचा पहिला भाग भरला नाही, त्यांना तो आता भरण्याचीही सुविधा 25 जूनपर्यंत उपलब्ध असेल.विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी 29 जूनरोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन प्रसिद्ध केली जाईल. या यादीमध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास अथवा चूक झाली असल्यास विद्यार्थ्यांना त्यावर 30 जून ते 2 जुलै 2018 पर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये लेखी हरकती नोंदविता येणार आहेत. हरकतींची 3 जुलै रोजी छाननी करून निवारण केले जाईल.

चौथी गुणवत्ता यादी 29 जुलै रोजी
पहिली गुणवत्ता यादी 5 जुलै 2018 रोजी जाहीर केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी 6 ते 9 जुलै 2018 दरम्यान महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्‍चित करायचा आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत. दुसरी गुणवत्ता यादी 13 जुलै 2018 रोजी जाहीर केली जाईल. 14 ते 16 जुलै 2018 दरम्यान दुसजया यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये जाऊन आपले प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. तिसरी गुणवत्ता यादी 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी 24 व 25 जुलै रोजी प्रवेश घ्यायचा आहे. चौथी गुणवत्ता यादी 29 जुलै रोजी जाहीर होईल.

महाविद्यालयांचे 10 पसंतीक्रम
अकरावी प्रवेश अर्जामध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे 10 पसंतीक्रम भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे मागील वर्षीचे कट ऑफ विचारात घेऊनच पसंतीक्रम भरणे आवश्यक आहे. विशेषत: पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयाचे नाव टाकताना अत्यंत काळजीपूर्वक टाकावे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय विद्यार्थ्यास मिळाल्यास त्याने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असेल. त्याने तिथे प्रवेश न घेतल्यास त्याचा अर्ज प्रवेशप्रक्रियेतून बाद होईल.

कोटा प्रवेशासाठी 25 जूनपर्यंत मुदत
विद्यार्थी ज्या शाळेत शिकला त्याच संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय असेल तर त्यांना तिथे कोटा प्रवेश मिळू शकेल. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या एकूण प्रवेशक्षमतेच्या 20 टक्के जागा त्यांच्या संस्थेतील दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी इनहाऊस कोट्यांतर्गत उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के जागांचा कोटा उपलब्ध असेल. त्याबरोबर अल्पसंख्यांक संस्थांना वेगळा कोटा असेल. सर्वप्रकारच्या कोटा प्रवेशासाठी 25 जून 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोटा प्रवेश मिळणे शक्य असेल तर त्यांनी मुदतीत प्रवेश घेणे आवश्यक आहे अन्यथा नियमित फेरीमधून प्रवेश घ्यावा लागेल.