अकरावी प्रवेशाला 19 जूनपासून सुरुवात

0

जळगाव। माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशसाठी धावपळ सुरु झाली आहे. 19 जून पासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून जिल्ह्याभरात 51 हजार पाचशे जागा आहे. यात कला शाखेच्या 23 हजार पाचशे, विज्ञान शाखेच्या 18 हजार वाणिज्य शाखेच्या 6 हजार एम.सी.व्ही.सी.च्या 3 हजार 550 जागा आहेत. शहरात यंदा अकरावीसाठी 7 हजार 550 जागा उपलब्ध आहेत. विनाअनुदानित व अनुदानित तुकड्यांसाठी जागा विभागण्यात आल्या आहेत. जळगाव शहरात 4 हजार 895 जागा या अनुदानित तुकड्यांसाठी तर 2 हजार 655 जागा या विनाअनुदानित तुकड्यांसाठी आहेत. अकरावी प्रवेशासंदर्भात 16 जून रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या उपस्थितीत शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन मू.जे.महाविद्यालयात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या बैैठकीत अकरावी प्रवेशासंदर्भाचे नियोजन ठरणार आहे. तसेच सध्या जरी 7 हजार 550 जागा उपलब्ध असल्या तरी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास जागादेखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

विज्ञान शाखेच्या तीन हजार जागा
अकरावी प्रवेशसाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसाठी एकूण 70 तुकड्या आहेत. त्यात 44 तुकड्या या अनुदानित तर 26 तुकड्या विनाअनुदानित आहेत. विज्ञान शाखेसाठी एकूण 3 हजार 375 जागांवर प्रवेश होणार आहेत. त्यात 1 हजार 755 प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये तर 1 हजार 620 प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होणार आहेत. वाणिज्य शाखेसाठी 1 हजार 635 जागा उपलब्ध आहेत. त्यात 1 हजार 305 प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये तर 630 प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होणार आहेत. कला शाखेसाठी 2 हजार 5 जागा उपलब्ध आहेत. त्यात 1 हजार 700 प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये तर 405 प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होणार आहेत.

तालुकानिहाय महाविद्यालये
अकरावी प्रवेश लवकरच सुरु होणार आहे. अमळनेर तालुक्यात 23 महाविद्यालय, भुसावळ 23, बोदवड 4, भडगाव 14, चाळीसगाव 22, चोपड 25, धरणगाव 12, एरंडोल 9, जळगाव ग्रामीण 11, जामनेर 10, मुक्ताईनगर 10, पारोळा 18, रावेर 25, पाचोरा 17, यावल 23, जळगाव शहर 23 असे एकुण जिल्ह्याभरातील 275 महाविद्यालय आहेत. यात अनुदानित महाविद्यालयाची संख्या 145, विनाअनुदानित 47, आश्रमशाळा 20, स्वयं अर्थसहाय्यीत 13, एमसीव्हीसी 50 महाविद्यालये आहेत.