हडपसर । सध्या तरुणाईचे आकर्षण असणार्या बुलेट गाडीचे राजेशाही थाटात शहरातून बिनधास्त राइड मारण्याचे फॅड वाढले आहे. दुचाकीतील राजेशाही वाहन म्हणून ओळखल्या जाणार्या बुलेटने अनेक ठिकाणी शांततेला सुरुंग लावला आहे. त्यामुळे अशा कर्कश आवाज करणार्या 11 बुलेट चालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि हडपसर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून 21 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आलेल्या नाका बंदीमध्ये 6 जानेवारीला सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
मोठा आवाज करणारे सायलेन्सर
या जप्त करण्यात आलेल्या बुलेट गाड्यांचे सायलेन्सर बदलण्यात आले असून त्याठिकाणी मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध कलमानुसार कारवाई करून 21 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार, पोलिस उपनिरीक्षक माणिक डोके, मोटार वाहन परीक्षक अमरसिंह गवारे आणि मयुर भोसेकर यांनी केली.
लक्ष वेधण्यासाठी गाड्यांमध्ये बदल
बुलेटच्या सायलेन्सरमध्ये रबर लावला की मूळ बुलेटच्या आवाजात जवळपास दहा पटीने आवाज वाढतो. त्यामुळे पोलिसांनी या बुलेटची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. तरुणांमध्ये बुलेटची क्रेझ आली आहे. बुलेटचा आवाज वाढवल्याने सर्वांचे लक्ष वेधले जाते. विशेषत: मुलींमध्ये प्रभाव पाडण्यासाठी तरुण मुले असे प्रकार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आत्ता बुलेटलाही सेल्फ स्टाट
बुलेट हे वाहन पूर्वी प्रतिष्ठेचे मानले जात होते. बुलेट सुरू करायलाही मोठे कष्ट पडत होते. त्यामुळे सर्वसामान्य लोक या वाहनांच्या भानगडी पडत नव्हते. परंतु आता बुलेटलाही सेल्फ स्टार्ट आले आणि बुलेट चालविणार्यांची संख्याही वाढत गेली. मात्र वाढलेल्या या बुलेटने शहराची शांतता भंग केली आहे. कर्कश आवाज करीत शहरातील रस्त्यांवरून बुलेट धावत असल्याने ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. खास करून महाविद्यालयीन तरुण लक्ष वेधण्यासाठी बुलेटचा चित्रविचित्र आवाज काढतात. अशा बुलेटवर कारवाई करण्यासाठी पोलीस व आरटीओने बडगा उगारला आहे.