अकोल्याच्या उमेश राठींना खंडपीठातही दिलासा नाही

0

भुसावळातील उद्योगपती मनोज बियाणींना बनावट कागदपत्रांद्वारे 90 लाखांत गंडवल्याचे प्रकरण ; आरोपीने खंडपीठात जामीन अर्ज घेतला मागे

भुसावळ- शेतजमीन अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रे सादर करून भुसावळ येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा नगरसेवक मनोज बियाणी यांना 90 लाख रुपयात फसवण्यात आले होते. या प्रकरणी अकोला येथील उद्योगपती तथा संशयित आरोपी विवेक रामराव पारस्कर (रा.तोष्णिवा ले आऊट, अकोला) व प्रॉपर्टी ब्रोकर उमेश कन्हैयालाल राठी (साई सदन, रणपिसे नगर, अकोला) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात 16 सप्टेंबर 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी राठी यांचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती मात्र येथेदेखील त्यांना दिलासा न मिळाल्याने गुरूवानी त्यांनी जामीन अर्ज मागे घेतला.

शेतजमीन अस्तित्वात नसताना केली फसवणूक
भुसावळ तालुक्यातील खडका येथे शेतजमीन गट क्रमांक 168/169 चे कागदपत्र तयार करून 26 लाख एक हजार रुपये किमतीत सौदा करून ईसार पावतीवर खरेदी करून देण्याचा प्रयत्न आरोपी पारसकर व ब्रोकर राठी यांनी केला. हा व्यवहार 2015 साली करण्यात आला होता. यावेळी बियाणी यांनी संशयित आरोपींंना पैसे दिले होते मात्र संशयित दोन्ही आरोपी खरेदीसाठी येत नव्हत. त्यामुळे बियाणी यांनी त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली, मात्र खरेदी करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे बियाणी यांचा संशय बळावल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले. आरोपींनी बनावट सही, शिक्क्यांद्वारे शेतजमिनीच्या ईसारा पावतीपोटी 90 लाखांची रक्कम हडपली होती.

आरोपीला दिलासा नाहीच
संशयीत आरोपी उमेश राठी याचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्याने खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता. गुरूवारी या जामीन अर्जावर सुनावली झाली मात्र खंडपीठाकडूनही दिलासा मिळत नसल्याने राठी यांनी जामीन अर्ज मागे घेतला. राठी याच्यातर्फे अ‍ॅड.नावंदर तर सरकारतर्फे अ‍ॅड.विरधे तसेच तक्रारदार मनोज बियाणी यांच्यातर्फे अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी युक्तीवाद केला.