नऊ वाहनांवर कारवाई ; तीन व्यक्तिंवर गुन्हा
अक्कलकुवा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका याबाबत अनेकवेळा प्रशासनामार्फत आवाहन करुनही दुचाकी व चारचाकी वाहनचालक गावात फेरफटका मारतांना दिसुन येत आहेत. परिणामी बाजारात व शहरात गर्दी कमी होण्याऐवजी वाढतंच चालल्याचे दिसून येत असल्यामुळे अक्कलकुवा पोलिसांनी सक्तीने कारवाईला सुरुवात केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, प्रभारी तहसीलदार विजय कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे व वाहतुक शाखेने एक दिवसात 26 मोटार सायकली जमा केल्या व त्यांच्याकडुन जास्तीत जास्त दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच नऊ वाहनांवर कारवाई व तीन व्यक्तिंवर १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यां टवाळ खोरांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
संचारबंदी काळात नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरत आहेत. यामुळे शासनाचा संचार बंदी व लॉकडाऊनच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. प्रशासनाने तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे भाजीपाला तसेच गटसाधन केंद्राच्या आवारात बाजाराचे अलगीकरण करून देखील नागरिक त्या परिसरात खरेदी करण्याऐवजी शहरातच व इतर भागात येत आहेत. काही जण विनाकारण फेरफटका व मौज मजा करण्यासाठी शहरात येत आहेत. नागरिकांना वारंवार आवाहन करुन देखील शहरातील टवाळखोर ऐकत नसल्यामुळे अक्कलकुवा पोलिसांकडुन आता थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे. विनाकारण शहरात वाहने येत असल्यास त्यांची चौकशी करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार सकाळी १० वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत अक्कलकुवा शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून पॉर्इंट लावण्यात आले आहेत. अशा ठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालक आढळून आल्यास आधी त्याची चौकशी केली जात आहे. त्यानंतर थेट वाहने जमा केली जात आहेत. एक दिवसात 26 मोटार सायकली जमा करण्यात आल्या. जमा केलेली वाहने ऑनलाईन दंड भरून सोडली जात असुन त्यांना दंडाची पावती दिली जात आहे.
अक्कलकुवा शहरात पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, सहा.पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन, हेड कॉन्स्टेबल शिरसाळे, मोहने वाहतूक शाखेचे पो कॉ.धनंजय धनगर, शरद पाटील ,कन्हैयालाल परदेशी यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.