नंदुरबार । अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विदयालयात गुरुवारी दहाविची विद्यार्थिनी जागृती नामदेव पावरा हिने वस्तीगृहातील जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकिस आल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी अक्कलकुवा शहरा सह खापर, सोरापाडा तसेच परिसरात कडकडित बंद पाळण्यात आला. शहरातील विविध शैक्षणिक संस्थानी बंद दरम्यान शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहिर करुन बंदला पाठिंबा दिला.
शाळा प्रशासनावर आरोप
नवोदय समिती दिल्लीमार्फत चालणारी जवाहर नवोदय विदयालय ही केंद्रिय शाळा असुन या अक्कलकुवा जवाहर नवोदय विदयालयाचे अध्यक्ष हे नंदुरबार जिल्हयाचे जिल्हाधिकारी असून ही शाळा त्यांच्या देखरेखीत चालते. मात्र संपुर्ण जिल्हयाचा कारभार चालवताना त्यांना या शाळेकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नाही, त्यामुळेच येथील कर्मचार्यांवर कोणाचीही पकड नाही, त्यांच्या हलगर्जी पणामुळेच जागृतीला आपला प्राण गमवावा लागला असून जागृतीची आत्महत्या नसून घातपात झाला आहे. याला नवोदय विद्यालयाचे प्रशासन जबाबदार आहे असा आरोप जागृतीच्या पालकांनी केला आहे.
नागरिकांचा प्रतिसाद
गुरुवारपासुन अक्कलकुवासह परिसरात या घटनेविषयी सर्व स्तरावरुन हळहळ व्यक्त करण्यात येत होती. शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी व आदिवासी महासंघाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ अक्कलकुवा बंद ठेवण्याची हाक देण्यात आल्यानंतर शनिवारी बंदच्या हाकेला साद देत अक्कलकुवा ,खापर सह परिसरातील व्यापा-यांनी घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. यात शिवनेरी चौक, मुख्य-बाजार पेठ, भाजी मार्केट, आमलीबारी रोड, तळोदा नाका, फेमस चौक, झेंडा चौक, परदेशी गल्ली, बस स्टेशन परिसर तसेच संपुर्ण शहरातील व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.
पदाधिकार्यांतर्फे आवाहन
खेड्यापाड्यातील आदिवासी बांधवांची तसेच फेरिवाल्यांची गैरसोय झाली, मात्र त्यांना बंदची माहिती मिळताच तेहि आपल्या गावी माघारी गेलेत शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, डॉ विक्रांत मोरे, तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी युवा जिल्हाधिकारी विनोद वळवी, गिरधर पाडवी, राजेंद्र पाडवी अल्पसंख्यांक शिवसेना तालुका प्रमुख आशिफ मक्राणी, शहर प्रमुख शाकिब पठाण आदी पदाधिकार्यांनी बंद साठी आवाहन केले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.