धुळे । पांझरा काठावरील गावांना तीव्र उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्यामुळे तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतर करावे लागत असल्यामुळे अक्कलपाडा धरणात शिल्लक असणारा 400 द.ल.घ.फू. पाण्याच्या मृत जलसाठा नदी विमोचकाव्दारा (स्लुएस गेटने) तात्काळ सोडण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिले. निम्न पांझरा अक्कलपाडा धरणात शिल्लक असणार्या 1200 द.ल.घ.फू. साठ्यातून 20 एप्रिल रोजी 500 द.ल.घ.फू. पाण्याचे एक आवर्तन यापुर्वीच देण्यात आले आहे. सदर आवर्तनामुळे एैन टंचाईच्या काळात पांझरा काठावरील नळपाणी पुरवठा योजनांना त्याचा लाभ झाला आहे.
114 गावांना लाभ
साक्री, शिंदखेडा, धुळे व धुळे शहर आणि अमळनेर तालुक्यातील सुमारे 114 गावांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या आवर्तनाचा लाभ झाला आहे. सुमारे महिन्याभरातच उन्हाची तीव्रता धुळे जिल्ह्यात वाढल्याने पांझरा काठावरील विहीरी, नळपाणी पुरवठा व जनावरांना पाण्याची टंचाई भासत आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जनावरे स्थलांतरीत करावी लागत आहेत. तसेच पांझरा काठावरील विहीरी कोरड्या पडू लागल्या आहेत.
60 किमी पाणी प्रवास
मृत जलसाठा नदी विमोचकाव्दारे सोडून दिल्यास व कुठलाही अडथळा न ठेवल्यास किमान 60 कि.मी. या पाण्याचा प्रवास होवू शकतो. त्यामुळे पुन्हा पांझरा काठावरील गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. अक्कलपाडा धरणातील मृत जलसाठा पांझरा पात्रात सोडून देण्यासाठी तळाला एक दरवाजा आहे. 22 मे नंतर कोणत्याही सोडून द्यावा व टंचाई दूर करावी अशी मागणी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी निवेदनाव्दारे केली आहे.