वनविभागाची सतर्कता ; ट्रक चालकासह क्लीनरला अटक ; 21 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त , भाजपा पंचायत समिती सदस्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा
साक्री- अक्कलपाडा धरणाच्या पात्रासह तालुक्यातील गंगापूर परीसरातील हॉटेल राजकमलसह एका ट्रकमधून तब्बल सात लाखांच्या ऑईलसह एकूण 21 लाख 66 हजारांचा मुद्देमाल साक्री पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. महामार्गाच्या कामासाठी हे डांबराप्रमाणे दिसणारे ऑईल वापरण्यात येणार असल्याची दाट शक्यता असून तीन दिवसांपासून माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी दखल न घेतल्यानंतर वनविभागाने मात्र हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिसांना दखल घ्यावी लागल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. या प्रकरणी साक्रीतील भाजपाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्यासह सात आरोपींविरुद्ध साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये एका सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाचा समावेश असून तोच या गुन्ह्यातील सूत्रधार असल्याचे समजते तर पोलिसांनी ट्रकच्या चालकासह क्लीनरला अटक केली आहे.
वनविभागाच्या सतर्कतेने गुन्हा उघडकीस
अक्कलपाडा धरणाच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर डांबराप्रमाणे दिसणारे 600 ड्रम ऑईल असल्याची व राजकमल हॉटेलमागे 300 ड्रम असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या वरीष्ठ अधिकार्यांसह कर्मचार्यांकडून तीन दिवसांपासून या भागात माहिती काढण्यात येत होती तर वनविभागाच्या कर्मचार्यांना त्यांच्या हद्दीत ऑईलचे ड्रम आढळल्याने त्यांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर या बाबीचा उलगडा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यातच साक्री पोलिसांना एका ट्रकमधून ऑईल वाहून नेले जात असल्याचे कळाल्यानंतर ट्रकसह चालकाला पकडल्यानंतर संपूर्ण प्रकरणांचे बिंग बाहेर पडले.
पंचायत समिती सदस्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा
ईच्छापूर पोलिस पाटील दादाजी गबा मारनर (27) यांनी साक्री पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक चालक मोहिनोद्दीन कुदरूद्दीन शहा (38,टेंगोर मशिदीजवळ, सेंधवा, जि.बडवाणी), क्लीनर देवेंद्र शोभाराम चव्हाण (30, तलकपुरा, जि.खरगोन), भाजपाचे साक्रीतील पंचायत समिती सदस्य रमेश सरग, बबलू यासीन शेख (गौसिया नगर, पिंपळनेर), हॉटेल राजकमलचा मालक (नाव, गाव माहित नाही), महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे अनिलभाई (वाशी गल्ला, मार्केट, नवी मुंबई), सलीमभाई (मुंब्रा) यांच्याविरुद्ध साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी विषारी केमिकल ऑईल नागरीकांच्या आरोग्याला बाधा निर्माण होईल या पद्धत्तीने जलसाठ्यात टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ट्रक चालकासह क्लीनरला अटक करण्यात आली आहे.
21 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपी ट्रक चालकांच्या ताब्यातून 14 लाख 10 हजार रुपये किंमतीचा ट्रक (एम.एच.18 बी.जी.6709) व त्यात असलेले 200 लिटर केमिकल ऑईल, सहा लाख 30 हजार रुपयांचे केमिकल ऑईल भरलेले लोखंडी ड्रम तसेच एक लाख 26 हजार रुपये किंमतीचे 60 केमिकल भरलेले लोखंडी ड्रम मिळून 21 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वनविभागाला चौकशीकामी बोलावले -हेमंत पाटील
वनविभागाच्या हद्दीतील जमिनीवर लोखंडी ड्रममधील रसायन असल्याने तीन दिवसांपूर्वी त्यांना कारवाईबाबत सूचना केल्या होत्या शिवाय त्यांनी याकामी काय दखल घेतली यासाठी गुरुवारी चौकशीकामी बोलावले असल्याचे धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.
ते डांबराप्रमाणे दिसणारे ऑईल महामार्ग कामासाठी?
समजलेल्या माहितीनुसार डांबराप्रमाणे दिसणारे हे ऑईल महामार्गाच्या कामासाठी वापरले जाणार होते मात्र त्यापूर्वी या प्रकरणाचे बिंग फुटल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राजकीय पदाधिकार्यांसह थेट पोलिस विभागातील सेवानिवृत्त मुलाचा समावेश असल्याने पोलिस या प्रकरणाचा खोलवर जावून तपास करून दोषींच्या मुसक्या आवळतील का? असा प्रश्न सुज्ञ नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.