धुळे। येत्या पावसाळ्यात निम्न पांझरा अक्कलपाडा धरणात 100 टक्के जलसाठा निर्माण करण्यासाठी 15 मे पूर्वी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, धरणात बुडणार्या संबंधितांना कायदेशीर नोटीस बजवावी, डाव्या कालवा कि.मी. शून्य ते एकचे काम जून 2017 अखेर पूर्ण करुन संबंधितांकडून दाखले मिळवावेत, नकाणे व हारण्यामाळ तलाव पूर्ण क्षमतेने भरुन घेण्याकरिता 30 जूनपुर्वी धुळे महानगरपालिकेकडून डाव्या कालव्याची स्वच्छता व दुरुस्ती करुन घ्यावी, अशा प्रमुख सहा मागण्यांचे निवेदन धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
पाणी अडविणे महत्वाचे
गेल्यावर्षी जुलै महिन्यात पांझरा नदीच्या उगमावर प्रचंड पाऊस झाल्याने नदीतून व धरणातून हजारो द.ल.घ.फू. पाणी वाया गेले. कारण धरणाचे दरवाजे बंद करुन 100 टक्के जलसाठा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी, यंदा डावा कालवा व पांझरा नदी कोरडीच राहिली. सदर वाहून जाणारे पाणी गेल्यावर्षी अडविले असते तर पाणी नदी दररोज 250 क्युसेसने मार्च,एप्रिल,मे,जून या महिन्यांत पांझरेत पाणी वाहते राहिले असते. यावर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत अक्कलपाडा धरणाखालील शेतकर्यांना धरणाच्या पाण्याच्या लाभासाठी आंदोलन करावे लागले. परिणामी, निष्पाप शेतकर्यांना अधिकार्यांच्या चुकीमुळे पोलिसांचा मार खावून तुरुंगात जावे लागले.
अधिकार्यांवर ओढले ताशेरे
निम्न पांझरा अक्कलपाडा मुख्य धरणाचे काम डिसेंबर 2013 ला 100 टक्के पूर्ण झाले आहे. या धरणाचा नव्याने प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाल्याने धरणाच्या अपूर्ण कामांसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. मात्र 500 कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या धरणाचा गेल्या 3 वर्षापासून लाभ क्षेत्रातील शेतकर्यांना व गावांना पाण्याचा लाभ मिळत नाही. यासाठी गेल्या 3 वषारत धरणाशी संबंधित प्रशासनात बसलेले अधिकार्यांनी तांत्रिक बाबींची पुर्तता केली नाही. शिवाय काही लोकप्रतिनिधींच्या प्रभावाखाली जाणीवपुर्वक जलसाठा निर्माण न करता काही कळीची कामे अपूर्ण ठेवली आहेत. यामध्ये सय्यदनगरचे 100 टक्के पुर्नवसन, डाव्या कालव्याचे शून्य ते 1 कि.मी.चे काम या गोष्टींचा समावेश आहे.
… तर प्रश्न गंभीर
यंदा धरणात जलसाठा निर्माण न केल्यास अक्कलपाडाच्या पाणी प्रश्नांवरुन आगामी काळात धुळे तालुक्यात टंचाई निर्माण झाल्यास धुळे तालुक्यात कायदा- सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो,असेही प्रा.पाटील यांनी निवेदनात सुचित केले आहे. निवेदन देते वेळी सदर निवेदन देतेवेळी प्रा.शरद पाटील यांच्या समवेत पंचायत समिती माजी सभापती कैलास पाटील, मनिष जोशी(नेर), मंगलसिंग गिरासे(देऊर), कृष्णा खताळ(भदाणे), लक्ष्मण पाटील(खंडलाय), भगवान पाटील(शिरधाने), सुनील पाटील(मोराणे), गोटन परदेशी(कुसुंबा), आसाराम आबा (बिलाडी),प्रकाश वाघ(न्याहळोद),मनोज पवार आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.