धुळे। अ क्कलपाडा धरणात शिल्लक असणारा मृत जलसाठा सोडण्यासाठी जिल्हा प्रशासन जाणीवपुर्वक टाळाटाळ करीत आहे. मात्र धुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त आणि पाणीटंचाईला तोंड देणार्या जनतेला छळण्याचा विडा जिल्हा प्रशासनाने उचलला आहे. येत्या सोवारी,दि.29 मे रोजी पांझरेतून आवर्तन न सोडल्यास मंगळवार,दि.30 मे रोजी जिल्हाधिकार्यांना त्यांच्याच कार्यालयात आवर्तन सुटेपर्यंत घेराव घालण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एका पत्रकाव्दारे दिला आहे.
लाठीमाराच्या जखमा ओल्या! : यंदा पांझरा काठावरील जनतेला प्रचंड टंचाईला तोंड द्यावे लागले. शिवाय पाणी मागणार्या जनतेला व शेतकर्यांना पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. तालुक्यातील शेतकरी प्रशासनाचा वेळकाढूपणा व निष्काळजीपणा अजून विसरलले नाहीत. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती अक्कलापाडा धरण भरण्याबाबत जिल्हाधिकार्यासह पाटबंधारे विभागाची दिसत आहे. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत(दि.29 मे) अक्कलपाड्यातून आवर्तन न सुटल्यास जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना त्यांच्याच कार्यालयात शिवसेना कार्यकर्ते व महिलांतर्फे घेराव घालण्यात येईल,असा इशारा प्रा.पाटील यांनी दिला आहे.
जनतेचे हाल थांबतील : अक्कलपाडा धरणामध्ये जवळपास 400 द.ल.घ.फू. जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा नदीविमोचकाव्दारे (स्लुएस गेटव्दारे) सोडल्यास जवळपास या पाण्याचा प्रवास 50 कि.मी.पर्यंत होवू शकतो. त्यामुळे पांझरा काठावरील बंद पडलेल्या नळपाणी पुरवठा योजना सुरु होवून जनतेचे हाल थांबतील, अशी अपेक्षा प्रशासनाकडून होती. मात्र एसीमध्ये बसून कामकाज करणार्या अधिकार्यांना ते जनतेचे हाल कळणे शक्य नाही. गेल्यावर्षी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अक्कलपाड्यातून हजारो द.ल.घ.फू. पाणी वाया गेले होते.
अनेक गावात पाणीटंचाई
गेल्या 20 दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट आल्याने तालुक्यासकट पांझरा काठावरील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळपाणी पुरवठा योजनांच्या पांझरा काठावरील विहीरी कोरड्या झाल्याने अनेक गावांतील महिलांना पाणी भरण्यासाठी जंगलातील विहिरीवर वणवण हिंडावे लागत आहे. शिवाय नदीपात्रात पाणी नसल्याने पाळीव जनावरांचेसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात दि.19 मे रोजी जिल्हाधिकार्यांना तातडीने पाणी सोडण्यासाठी विनंती प्रा.शरद पाटील यांनी केली होती. सदर मृत जलसाठा दि.15 जूननंतरच सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजल्याामुळे संतप्त झालेल्या प्रा.शरद पाटील यांनी सदर मृत जलसाठ्याचे प्रशासन लोणचे घालणार आहे काय?,असा सवाल केला आहे.