भुसावळ। जगभरात मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन व त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम होवून हवामानात झपाट्याने बदल होत असल्यामुळे वसुंधरेचे आरोग्य धोक्यात आले आहे. केवळ वसुंधरादिनीच पर्यावरणाची काळजी घेवून भागणार नाही तर वर्षातील संपूर्ण 365 दिवस आपल्याला संंपूर्ण धरेची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गेल्या 25 वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले सुरेंद्र चौधरी यांनी पर्यावरणस्नेही अक्षय ऊर्जेच्या जनजागृतीसाठी तालुक्यातील किन्ही परिसरात पर्यावरणपुरक वत्सल ऊर्जा आश्रमाची उभारणी करीत आहे.
बांधकामासाठी पर्यावरणपुरक साहित्य
या आश्रमात पर्यावरणपुरक बांधकाम साहित्य वापरुन ग्रीन बिल्डींगच्या तत्वावर व जगप्रसिध्द आर्किटेक्ट स्व. लॉरी बेकर यांच्या शैलीत वास्तू उभारली जात आहे. यामध्ये सिमेंट, विटा, वाळू यांचा वापर टाळून त्याऐवजी औष्णिक वीज केंद्राच्या टाकाऊ राखेचा वापर करुन बनविलेल्या विटा त्यांना जोडण्यासाठी सिमेंटऐवजी केटू या ब्लॉक फिक्सिंग केमिकल बेस्डचा वापर केला. याचे वैेशिष्ट्य म्हणजे अतिशय कमी वेळेत बांधकाम पूर्ण होवून पाणीदेखील कमी लागते.
पाटसरी नाल्यांवर उभारले बंधारे
उन्हाळ्यात ही वास्तू तापत नाही तर हिवाळ्यात आतील वातावरण ऊबदार राहते. तसेच यातील प्रकाश व्यवस्थादेखील नैसर्गिक राहील. वीज कनेक्शनऐवजी सौर पॅनल उभारुन विजनिर्मीती केली जाईल. विंधन विहिरीतून हातपंपाद्वारे आवश्यक तेवढेच पाणी वापरले जाईल. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून परिसरात पाटसरी नाल्यावर श्रमदानाद्वारे दगडमातीचे बंधारे बांधून पाणी मुरवण्यात येत आहे. यासाठी वत्सल ऊर्जा आश्रमाचे मानक संचालक अभियंता सुरेंद्र चौधरी व त्यांचे सहकारी मिलींद भारंबे, संजीव पाटील, भागवत भिरुड, प्रा. वसंत खरे, विवेक वणीकर, स्थापत्य अभियंता अविनाश महाजन, सतिश तळेले, भुरा सुरवाडे यांचे सहकार्य लाभत आहे.