भुसावळ । उन्हाळ्यात गारवा मिळविण्यासाठी शीतपेयांचा वापर करताना आरोग्यास अत्यंत घातक बर्फाचा वापर केला जात आहे. नाशवंत खाद्यपदार्थ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पाठविताना दीर्घकाळ टिकावे म्हणून पॅकिंगकरिता बर्फाचा वापर केला जातो. हा अखाद्य बर्फच शीतपेयांसह बर्फ गोळ्यासाठी वापरला जात आहे. हा बर्फ तयार केल्या जात असलेल्या कारखान्यांमध्ये स्वच्छतेचे कोणतेही मानके पाळल्या जात नसून, आरोग्यासाठी घातक अशा दूषित पाण्यापासून बर्फ तयार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आढळून आले.
पालकांनी मुलांना आवर घालावा
उन्हाळ्यात गारवा मिळविण्यासाठी शीतपेयांचा वापर केला जातो. या शीतपेयांमध्ये वापरल्या जाणारा बर्फ अनेक रोगांना निमंत्रण देणारा ठरत आहे. बर्फ सेवनामुळे गळ्याच्या आजारासोबत अनेक असाध्य आजार जडत असतानाही पालक त्यांच्या मुलांना बर्फ खाण्यापासून थांबवित नाही. उसाचा रस, वेगवेगळ्या फळांचा ज्यूस आणि इतर शीतपेयांमध्ये हा बर्फ वापरला जातो. तो बर्फ तयार कसा केला जातो, त्यासाठी यंत्रणा कोणती वापरली जाते? पाण्यात कोणतेही पदार्थ सहज विरघळून जातात. पाण्यातूनच अनेक साथ रोग पसरतात. पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही काळजी या कारखान्यात घेतली जात नाही. बर्फाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूही अस्वच्छ असतात.
हाताळणीत स्वच्छतेकडे होते दुर्लक्ष
बर्फाचे तुकडे केल्यानंतर त्यातील एक तुकडा थेट सायकलवर ठेवून तो शीतपेयाच्या दुकानापर्यंत पोहोचविण्यात येतात. या सर्व प्रक्रियेत बर्फाच्या शुद्धतेबाबत कुठेही काळजी घेण्यात येत नाही. अगदी रस्त्याने घेऊन जातानाही बर्फावर आच्छादन टाकले जात नाही. तसेच ऑटोरिक्षातून बर्फाची होणारी वाहतूक. दिवसभर प्रवासांच्या चप्पल व बुटांची घाण ऑटोला लागली असते. त्याच जागेवर कोणत्याही आवरणासह बर्फ टाकून तो एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहोचविला जातो.
सॅकरीनचा वापर
उन्हाळा आला की, थंड पेय विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात. ग्रामीण भागातील गावागावांत तसेच शहरी भागात बर्फगोळा विकणार्या गाड्यांची रेलचेल पाहावयास मिळते परंतु ते खाताना काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. या गोळ्यांतील बर्फासाठी दूषित पाणी वापले जात असून, रासायनिक रंगांच्या वापरही केला जात आहे. तो आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. बर्फगोळ्यात वापरल्या जाणार्या रासायनिक रंगही निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व त्याचा खाद्यपदार्थात वापर केल्यामुळे घशाचे विकार वाढल्याचे समोर येत आहेत.
बर्फावर टाकल्या जाणार्या रासायनिक रंगासोबत बर्फाच्या गोळ्याला गोडवा मिळावा म्हणून सॅकरीनचा वापर केला जात आहे. सॅकरीचा खाद्यपदार्थांमध्ये वापर अनेक आजारांना निमंत्रण देणारे असून, लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. त्यामुळे गारवा मिळविण्यासाठी उन्हाळ्यात बर्फाचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो.