अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळून देऊ – मनसे

0

यवतमाळ : ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार असल्याने हा मुद्दा उचलून धरत मनसेने साहित्य संमेलन उधळण्याचा इशारा दिला आहे. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकांच्या हस्ते का? असा प्रश्न उपस्थित करत मनसेने हे संमेलन उधळण्याचा इशारा दिला आहे.

यवतमाळ येथे ११ जानेवारीपासून साहित्य संमेलन सुरु होणार आहे. मराठी साहित्यिक हे आपल्या राज्यातच नाहीत तर देशभरात असून त्यांचे साहित्यही देशभरात वाचले जाते, असे असतानाही मराठी साहित्य संमेलनाला इंग्रजी साहित्यिकांना का बोलावलं जातं आहे? असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे. या साहित्य संमेलनाचे जर मराठी साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन होणार नसेल तर आम्ही हे संमेलन उधळून देऊ  असा इशाराच मनसेने दिला आहे. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरूणा ढेरे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. दरम्यान देशात असहिष्णू वातावरण आहे अशी तक्रार करत पुरस्कार परत करण्यात पुढाकार घेणाऱ्या पहिल्या साहित्यिक म्हणजे नयनतारा सहगल या आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची तरतूद नसल्याने आपण हा पुरस्कार पुन्हा स्विकारतोय असंही त्यांनी म्हटलं होतं. नयनतारा सहगल या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाची आहेत. १९८६ मध्ये त्यांना रिच लाइक अस या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.