येरवडा : एअरपोर्ट मार्गावर पालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून व निकृष्ट दर्जाचे काम झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्य सभागृहाची सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकाअधीक्षक अभियंता संदीप खांडगे यांनी दिली. एअरपोर्ट मार्गावर पालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची उभारणी करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते.
अधिकार्यांनी केली होती पाहणी
याबाबत पाठपुरावा करून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे रंगमंदिर कृती समितीचे संस्थापक अशोक जगताप यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना समितीच्या वतीने निवेदन देऊन नाट्यगृहाची सुधारणा करण्याची मागणी केली होती. तेव्हा अधीक्षक अभियंता संदीप खांडगे, कार्यकारी अभियंता संजयशिंदे, इरफान शेख यांनी समक्ष येऊन मागील आठवड्यात येऊन नाट्यगृहाची पाहणी केली होती. त्यावेळेस स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था,एसी मशीनला सरंक्षणार्थ लोखंडी जाळी न बसविणे, फर्निचरचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम, छतावर बसविण्यात आलेले फर्निचर आदी बाबी यामध्ये आढळून आल्या होत्या. या संदर्भात बुधवारी(दि.21) समिती व अधिकारी यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी समितीचे नगरसेवक अविनाश साळवे, जरलदास जोसेफ, सुधीर नेटके, दुर्गेश हातागळे,सुनील जाधव, लक्ष्मण काते, विनोद वैरागर, सोमनाथ कांबळे, रवी खैरनार व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
अर्धवट कामे आठ दिवसात पुर्ण करणार
यावेळी अर्धवट असलेले काम येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण करण्यात येणार असून यामध्ये बोधवाक्य, घड्याळाचा आवाज, एलईडी बसविणे, याबरोबरच नाट्यगृहासमोर अतिक्रमण करून व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी या विभागास लेखी पत्र देऊन कारवाई करण्यात येणार आहे. याबरोबरच आणखी काही सुधारणा करता येतील का? यावर चर्चा करण्यात आली. तसेच आणखी काही कमासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्वप्रथम याविरोधात जनशक्तीने आवाज उठवून वृत्त प्रसिध्द् केल्यामुळे समितीच्या वतीने जनशक्तीचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने अधीक्षक अभियंता संदीप खांडगे यांना निवेदन देण्यात आले.