…अखेर एरंडोल येथील आठवडे बाजाराचे झाले नियोजन

0

एरंडोल । शहरातील आठवड्याचा भरणारा बाजार हा वर्षानुवर्ष अंजनी काठावर भरत असतो. वाढती लोकसंख्या, शहराचा वाढणारा विस्तार या बाबींमुळे आठवडे बाजारात गेल्याकाही दिवसापासून शेतकरी व भाजी विक्रेते हे इंदोर-औरंगाबाद या राज्यमार्गावर भाजीपाला विक्री करीत होते. वास्तविक आठवडे बाजारात जागा शिल्लक असतांना सुद्धा काही विक्रेते रस्त्यावर आपला माल विकत होते.या मार्गावर होणार्‍या रहदारीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे यासाठी दैनिक जनशक्तीने एरंडोल आठवडे बाजारासाठी व्यवस्थापनाची गरज; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दाखल घेत रविवार 8 जानेवारी रोजी नगरपालिका विभागाने लक्ष घालून सदर विक्रेत्यांना रस्त्यावरून उठवुन पर्यायी जागेवर बसविण्यात आले. त्यामुळे बाजारात जाणार्‍या व येणार्‍या ग्राहकांसह वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान सदर बाजार हा दर रविवारी भरत असतो व त्या ठिकाणी एरंडोल व धरणगाव तालुक्यातील काही भाजीपाला विक्रेते हे आपला माल विक्री करण्यासाठी येत असतात. परंतु शहराची वाढत्या लोकसंख्या व विस्तारामुळे नगरपालिकेने मध्यंतरीच्या माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन त्यांच्या कार्यकाळात दहा ओटे बांधण्यात आले आहेत. आठवडे बाजारात नगरपालिकेच्या ओट्यावर जुने विक्रेते बसतात. परंतु बहुतांश बाहेर गावातून आलेले विक्रेते हे रिकाम्या असलेल्या जागेवर व ओट्यावर न बसता मरिमाता मंदिर ते पोलीस स्टेशनाच्या अगदी जवळच बसत होते. यामुळे इंदौर-औरंगाबाद या महामार्गावर वाहतुकीची प्रचंड प्रमाणावर कोंडी निर्माण होत होती. या गर्दीमुळे एखाद्या दिवशी फार मोठा अपघात झाला असता. काही विक्रेते हे बाजारातील ओट्यांवर न बसता खाली बसतात व या मुळे खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांना चालतांना खुप त्रास सहन करावा लागत होता. अशी परिस्थिती निर्माण झालेली होती.