चेन्नई: तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. मरीना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. यानंतर द्रमुकने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
करुणानिधी हे माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्यावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकत नाहीत, असे राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले. मात्र हा मुद्दा न्यायालयाने फेटाळून लावला. ‘करुणानिधी मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री जी. रामचंद्रन यांचे अंत्यविधी मरीना बीचवर होऊ दिले नव्हते. रामचंद्रन माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या पार्थिवावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार होऊ शकत नाहीत, असे त्यावेळी करुणानिधी यांच्याच सरकारनं सांगितलं होतं,’ असं अण्णा द्रमुकनं आज न्यायालयात सांगितलं. मात्र न्यायालयाने हा युक्तीवाद मान्य केला नाही.