अखेर….खडकी कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षपदी कमलेश चासकर यांची बिनविरोध निवड

0

दोन वेळा भरघोस मतांनी निवडून आलेले असूनही उपाध्यक्ष पदापासून होते दूर

कार्तिकी हिवरकर यांच्यावर महिला व बालकल्याण समितीची जबाबदारी

खडकी-मागिल दोन सत्रातील निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आलेले सदस्य कमलेश चासकर यांची अखेर खडकी कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्ड अध्यक्ष ब्रि. पी. एस. जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत आज सदस्य चासकर यांची कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सी.ई.ओ.अमोल जगताप, माजी उपाध्यक्ष व सदस्य अभय सावंत, ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळे, दुर्योधन भापकर, सदस्या कार्तिकी हिवरकर, पुजा आनंद, तसेच पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी उपाध्यक्ष बळीराम सावंत, बबनराव कदम, गिल्बर्ट पिंटो, डॉमनिक लोबो, रोहिदास गायकवाड, तुषार गांधी, लष्करी नाम निर्देशित सदस्य उपस्थित होते.

जबाबदारी पार पाडली
तत्कालीन उपाध्यक्ष अभय सावंत यांनी मागील महिन्यात उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तब्बल 17 महिने त्यांनी उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर नुतन उपाध्यक्ष करिताच्या हालचालीस वेग आला. सदस्य चासकर भापकर व सदस्या हिवरकर यांची नावे उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत पुढे आली. पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी कॅन्टोन्मेंट सदस्यांची या कामी दोन वेळा बैठक बोलावुन त्यात सदस्यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये चासकर यांच्या नावावर संमती दर्शविण्यात आली. आज बोर्ड सभेच्या दीड तास आगोदर बागवे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डात पुन्हा ऐकदा सदस्यांसोबत गुप्तरीत्या चर्चा केली. सर्व संमतीने नंतर चासकर यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. काँग्रेस सदस्यांसोबत सहकार्याची भुमिका घेणार्‍या भाजपाच्या सदस्या कार्तिकी हिवरकर यांच्यावर आरोग्य व रुग्णालय समितीच्या अध्यक्षपदाची तसेच महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी या वेळी देण्यात आली.

सावंत यांनी सुचविले नाव
तत्कालीन उपाध्यक्ष सावंत यांनी उपाध्यक्ष पदाकरिता चासकर यांचे नाव सुचविले. सदस्य कांबळे भापकर व सदस्या हिवरकर यांनी त्यास अनुमोदन दिले. अध्यक्ष ब्रि.जैस्वाल यांनी नंतर चासकर यांना उपाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र दिले. नवनियुक्त उपाध्यक्ष चासकर यांचे ब्रि.जैस्वाल बागवे तसेच सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी अध्यक्ष ब्रि.धीरज मोहन सी.ई.ओ.जगताप तसेच आमदार विजय काळे यांचे बोर्ड विकास कामी मोलाचे सहकार्य लाभले. उपाध्यक्ष चासकर म्हणाले की, यापुढे ही या सर्वांचे सहकार्य लाभेल असा विश्‍वास आहे. जनतेच्या सर्व अपेक्षा पुर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करु. 17 महिन्यांच्या कारकीर्दीत आपण खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील महत्वपुर्ण विकासकामे मार्गी लावली आहेत. याकामी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी तत्कालीन उपाध्यक्ष सावंत यांनी या वेळी आपली भुमिका मांडली. नवनियुक्त उपाध्यक्ष चासकर यांची दुपारी खडकी परिसरातुन विजय मिरवणुक काढण्यात आली.

पक्षबांधणीसाठी एकत्र आलो
बोर्ड सभेत या वेळी सर्व कॅन्टोन्मेंट समितीच्या पदाधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशान्वये तसेच सर्व सदस्य एकमताने चासकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे या वेळी बागवे यांनी त्यांच्याशी संवाद साधताना सांगितले. खडकी काँग्रेस एकसंध असुन जुने वाद विवाद विसरुन पक्ष बांधणी करीता सर्व एकत्रीत येतील असा विश्‍वास बागवे यांनी या वेळी व्यक्त केला.