अखेर जिल्ह‍ाभरातील बाजार समित्यांचे व्यवहार बंद

0

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आदेश

जळगाव– सोशल डिस्टन्स तर सोडाच कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्याने जळगाव बाजार समितीत भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी दुर्घटनेला निमंत्रण देत असल्याबाबत दै.जनशक्तिने ‘पोलिसांसह आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटतेय अन् नागरिकांच्या निर्लज्जपणाचा कळस, या शिर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते. त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव शहर, अमळनेर , भुसावळ आणि चाळीसगाव येथील बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचे आदेश शुक्रवारी निर्गमित केले आहे.

कारवाईनंतरही पुन्हा बाजार समितीत भाजीपाला विक्रेत्यांनी कुठल्याही आदेशाचे पालन न करता मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती . जणू हे भाजीपाला विक्रेते दुर्घटनेची वाट पाहत असल्याचे चित्र दिसून आले . याबाबत दै. जनशक्तिने व्हिडीओ सह वृत्ताद्वारे ८ एप्रिल रोजी वस्तुस्थिती मांडली होती.भाजीपाला विक्रेत्यासह नागरिक नियम धाब्यावर बसवुन कुठल्याही प्रकारे संवेदनशील नसुन गर्दी करुन विनाकारण बाहेर फिरुन स्वत;सोबतच दुसर्‍याच्या जिवावर ऊठले असल्याचे मत मांडले होते
तसेच जिल्हा प्रशासनाने कठोर भुमिका घ्यावी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

पुढील आदेश होईपर्यंत बंद

त्यानुसार वृत्ताची गंभीर दखल घेत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने जळगाव शहर, अमळनेर , भुसावळ आणि चाळीसगाव येथील बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.