अखेर टीम इंडियाची घोषणा

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयने रविवारी आयोजित विशेष आमसभेमध्ये मंजुरी दिल्यानंतर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सुरुवातीला आक्रमक असलेल्या बीसीसीआयने नरमाईची भूमिका घेत या करंडकात खेळण्यास संमती दिल्यानंतर भारतीय संघ घोषित करण्यात आला. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. 1 जुनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. संघ निवडीसाठी देण्यात आलेली मुदत संपवून 13 दिवस उलटल्यानंतर अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

असा आहे संघ
विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाची घोषणा भारताच्या निवड समितीकडून करण्यात आली आहे. तर रिषभ पंत, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे. जबरदस्त फॉर्मात असलेल्या गौतम गंभीरला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी संधी देण्यात आलेली नाही. ‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा संघ निवडताना गौतम गंभीरच्या नावाबद्दल चर्चा करण्यात आली नाही,’ असे निवड समितीने म्हटले. 2007 मधील टी-20 विश्वचषक आणि 2011 मधील विश्वचषक स्पर्धेत गौतम गंभीरने चांगली कामगिरी केली होती. सध्यादेखील गंभीर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मात्र गंभीरच्या नावाचा विचार निवड समितीने केलेला नाही.

1 जूनपासून प्रारंभ होणार्‍या स्पर्धेसाठी संघ इंग्लंडला जाणार असल्याचे खेळाडूंना सूचित करण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघ सहभागी होत असल्यामुळे मला मोठा दिलासा मिळाला आहे. पण खेळाडूंना संघ स्पर्धेत सहभागी होणारच आहे, याची कल्पना होती. मी वैयक्तिक अनिल कुंबळे व विराट कोहली यांच्यासोबत चर्चा केली असून, संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले. अन्य बोर्डांच्या तुलनेत 10 कोटी डॉलर जास्त मिळणे चांगले आहे, असे मी यापूर्वीही म्हटले आहे. -विनोद राय, सीओएप्रमुख

वाटपाच्या प्रमाणावरुन वाद
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 4 जूनला पाकिस्तानविरुद्ध होईल. आयसीसीला 25 एप्रिलपर्यंत संघाची यादी पाठवायची होती. मात्र आयसीसीसोबत महसूल वाटपाच्या प्रमाणावरुन वाद सुरु असल्याने बीसीसीआयने भारतीय संघाची निवड वेळेवर केली नाही. यानंतर रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत आयसीसीसोबतच्या कोणत्याही वादात न पडता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध मायदेशात भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळला होता. अमित मिश्राच्या जागी शामीला संधी मिळाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि लोकेश राहुल डावाची सुरुवात करतील.