अखेर नायजेरियन भामटा सापडला

0

फेसबुकव्दारे महिलांना कोट्यवधींचा गंडा

पिंपरी-चिंचवड : फेसबुकच्या माध्यमातून उच्चशिक्षित महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणारा नायजेरियन भामटा भोसरी पोलिसांच्या हाती लागला आहे. दिल्लीमधून या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने भारतभरातील उच्च शिक्षित अनेक महिलांना फेसबुकच्या माध्यमातून फसवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे मान्य केले आहे.

निगडीतील डॉक्टर महिलेची तक्रार
अझुबुके अरिबीके (वय 38) या नायजेरियन आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथील डॉ. प्रतिभा शामकुवर यांनी याविषयी तक्रार दाखल केली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. डॉ. प्रतिभा शामकुवर या महिलेने मागील महिन्यात याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले आणि सायबर विभागाच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी नायजेरियन तरुणाला अटक केली.

42 लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, विविध शहरांमधील उच्च शिक्षित महिलांशी फेसबुकच्या माध्यमातून आरोपी मैत्री करायचा. आपण स्वतः परदेशात असून तुम्हाला भेटवस्तू पाठवत आहे. ते कस्टम कडून सोडवण्यास सांगायचा. नंतर त्याचीच महिला साथीदार महिलांना फोन करून बँकेत लाखोंची रक्कम भरायला सांगत. या प्रकारामध्ये अझुबुके अरिबिके याचे आणखी चार-पाच साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आतापर्यंत या टोळीने बंगळुरू येथील महिलेची 60 लाख, कुलूमनाली येथील महिलेची 30 लाख, वसई येथील महिलेची आठ लाख, निगडी येथील महिलेची पाच लाख, तक्रार करणार्‍या महिलेची 42 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अजून फसवणुकीचे गुन्हे समोर येण्याची शक्यताही पोलिसानी वर्तवली आहे. यानुसार वसई व अन्य ठिकाणी आरोपीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.