अखेर पीएमपीचा अस्थापना आराखडा तयार

0

पुणे । गेल्या 11 वर्षांपासून केवळ चर्चिला जाणार्‍या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या आस्थापना आराखड्याला अखेर मुहूर्त मिळाला असून बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देखील देण्यात आली. 11 हजार 503 कर्मचारी संख्या असेल असा अंदाज ठेवून हा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली.

अनावश्यक खर्च कमी करून पीएमपीच्या प्रगतीसाठी उत्पन्नातून मिळणार्‍या पैशाचा वापर करता येईल, या विचार हा आराखडा तयार करण्यात आला असून गेल्या तीन महिन्यांपासून त्यासाठीची प्रक्रीया सुरू होती. 2007 अखेर पीएमटी व पीसीएमटीचे एकत्रीकरण करून पुणे परिवहन महानगर (पीएमपी) ही कंपनी स्थापन करण्यात आली. सुरुवात योग्य झाली, पण नंतर पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पीएमपी कंपनी म्हणून चालविण्यासाठी आस्थापना आराखडा तयार करण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान 2013 साली सेंट्रल इंस्टीस्ट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टकडून पीएमपीला आराखडा तयार करून देण्यात आला होता. मात्र त्याची अमंलबजावणी करण्यासाठी त्यात काही बदल आवश्यक होते. ते बदल न झाल्याने त्याची पुर्णपणे अमंलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र मुंडे यांनी आता सुधारीत आराखडा तयार केला असून त्यात संचालक मंडळाची मान्यता मिळाली आहे.

सहाय्यक महाव्यवस्थापकाचे पद होणार रद्द
या आराखड्यानुसार आता 15 हजार 517 ऐवजी 11 हजार 503 कर्मचारी संख्या असेल, असे गृहीत धरण्यात आले असून पदनाम संख्या आणि ग्रेड-पेमध्ये काही घट करण्यात आली आहे. तसेच जनरल विभाग, वाहतूक, कार्यशाळा आणि लेखा व वित्त असे चार विभाग करण्यात आले असून त्यानुसार आता पीएमपीचे कामकाज चालणार आहे. दरम्यान सध्या सेवेत असलेल्या कोणत्याही अधिकारी व कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता तसेच वेतनात कोणताही बदल होणार नाही. ते संरक्षित करण्यात येईल. नवीन आस्थापनेमध्ये मान्य पदांवर नव्याने ज्या नियुक्ता होतील, त्यांना नवीन आस्थापनेचे वेतन लागू राहील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. तसेच आता सहाय्यक महाव्यवस्थापक हे पद रद्द करण्यात येणार असून त्याऐवजी ऑपरेशनल आणि अ‍ॅडमिनिड्रेशन अशी दोन महाव्यवस्थापक पदे तयार करण्यात येणार आहे.