बीड : न्यायालयीन प्रक्रियेमुळे २४ मेपासून उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर पडली. याच प्रकरणातील निर्णय आता सोमवारी म्हणजे ११ तारखेला लागणार असल्याचं हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सांगितले. यापूर्वीच निवडणूक आयोगाने ११ तारखेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश दिले होते असे असताना कोर्टाचा जो काही निर्णय येणार आहे, तोही ११ तारखेला येणार आहे. म्हणून आता ही मतमोजणीची प्रक्रिया ११ तारखेलाच म्हणजे निर्णयानंतर लगेच होणार, की त्यापुढे परत एकदा निवडणूक आयोग आपला प्रोग्राम बदलून देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
यामुळे लांबला निकाल
बीड नगरपालिकेच्या दहा नगरसेवकांना अपात्र केल्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली. त्यानंतर त्यांना मताचा अधिकारही मिळाला. मात्र त्यांचं मत हे बाजूला ठेवण्यात आल्याने परत ते नगरसेवक कोर्टामध्ये गेले आणि त्यामुळेच ही मतमोजणीची प्रक्रिया लांबणीवर पडली. कारण, त्या नगरसेवकांचं म्हणणं होतं, की आमचं मतदान बाजूला ठेवून मोजलं गेलं तर गोपनीयतेचा भंग होईल. येत्या १२ तारखेपर्यंत विधान परिषद सदस्यांची मुदत आहे. म्हणजे पहिल्या आमदाराचा कालावधी १२ तारखेला संपत असताना नेमकं मतमोजणी लांबणीवर पडल्याने काही कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.