जळगाव। शहरातील अजिंठा चौफुलीवरील गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या भगवान श्रीकृष्णाचे मंदिर स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला मान्यवारांची व ट्रस्टींची मान्यता घेतल्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशानंतर हटविण्यात प्रक्रीया झाली. महामार्गावरील चौपदरीकरणासाठी चौकाच्या डाव्या बाजूचे वळण मोकळे करण्यात येणार आहे. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, नगरससेवक नितीन बरडे, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कर्हाळे, उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते. कर्मचारी 3 जेसीबी, 20 टॅक्टरसह अजिंठा चौफुलीवर हजर होते. दंगानियंत्रण पथकासह पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. आमदार सुरेश भोळे यांचे सासरे सुरेश तुकाराम खडके यांनी 30 वर्षांपूर्वी भगवान श्री कृष्ण यांच्या मूर्तींची स्थापना केली होती. तसेच या मंदिराचा जिणोध्दार 2010 साली झाला होता.
सुयोग्य मार्किंगअभावी मोहिम रेंगाळली
ही कारवाई सुरू असतांना ‘न्हाई’चे अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी अजिंठा चौफुलीच्या चारही बाजूने गोलाईसाठी 40 फूटची मार्कींग केली होती. ही मार्कींग मंदिराच्या शेजारील सातपुडा शोरूमच्या कपांऊंडमध्ये देखील करण्यात आले होते. यामुळे जेसीबीद्वारे सातपुडा शोरूमचे कंपाऊंड तोडण्यास सुरूवात होताच ही कारवाई थांबविण्यात आली. यानंतर काही वेळ गोंधळ निर्माण झाला. मंदिर हटवित आहात तर शोरूममध्ये केलेल्या आखणीप्रमाणे त्याचे कंपाऊंड तोडण्याची नागरिकांनी मागणी केली. याबाबत न्हाई प्रकल्प सहसंचालक अरविंद गंधे यांनी चुकीची माहिती मिळाल्याने मंदिराच्या शेजारील सातपुडा शोरूम येथे मार्कींग केली गेली असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सुशोभीकरणासाठी त्यातील 40 फुटाची जागा घेण्यात येणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली. मंदिर स्थलांतरापुर्वी आमदार भोळे यांच्याहस्ते मुर्तीची विधीवत पूजा करण्यात आली.
14 डेरेदार वृक्षांचा बळी
पोलीस अधिक्षक दत्तात्रय कर्हाळे यांनी शहरात येतांना वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या अजिंठा चौफुलीजवळील ट्रक हटविण्याचे आदेश वाहतूक पोलीसांना दिलेत. चौक प्रशस्त करण्याच्या नावाखाली व त्याच्या सुशोभीकरण करण्यासाठी मंदिर परीसरातील 14 डेरेदार वृक्षांचा बळी देण्यात आला. यात पिंपळ, वड, कडुनिंब असे वृक्ष जेसीबी तसेच गॅस कटरच्या साह्याने तोडण्यात आलीत. वृक्ष तोडल्यावर त्याच्या मोबदल्यात याच जातीच्या वृक्षांची रोपे इतरत्र लावण्यात येतील अशी माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली.