अखेर रखडलेल्या बटरफ्लाय ब्रिजचे लोकार्पण

0

आमदारांना वेळ नसल्याने रखडले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरामध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. सत्ताधारी भाजपने रस्ते विकासावा भर दिला आहे. महालिकेच्यावतीने अनेक पुलांचे बांधकाम सुरू आहे. अशाच रखडलेल्या एका पुलाचे उद्घाटन आज झाले. चिंचवड ते डांगे चौक या रस्त्याला जोडणार्‍या पुलाचे लोकापर्ण करण्यासाठी आमदारांची वेळ मिळत
नव्हता. तसेच स्थानिक नगरसेवकांच्या वादामुळे रखडले होते. मात्र मंगळवारी महापौर नितीन काळजे यांच्या उपस्थितीत आणि आमदारांच्या अनुपस्थितीत मंगळवारी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अठरा महिन्यामध्ये या पुलाचे काम पूर्ण करायचे आहे. या पुलामुळे रहदारीचा प्रश्‍न मिटणार आहे.

थेरगाव प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रसुनधाम शेजारी 18 मीटर डी.पी. रस्त्याच्या कामांतर्गत थेरगाव ते चिंचवड बटरफ्लाय पूल बांधण्यासाठी महापालिका स्थायी समितीने दि. 6 ऑक्टोबर 2017 रोजी ठराव मंजूर केला. संबंधित काम मे. धनेश्‍वर कन्स्ट्रक्शन या संस्थेला देण्यात आले. सुमारे 29 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने मान्यता देवून वर्क ऑर्डरही काढली. संबंधित काम 18 महिन्यांत पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला मुदत दिली आहे. या पुलाची एकूण लांबी 107.575 मीटर ऐवढी आहे. तर पुलाची रूंदी 16.200 मीटर आहे. पुलाचे पदपथ 3 मीटर दोन्ही बाजुस आहे. कमानीची एकूण लांबी 100 मीटर तर तुळई जाळी 2 मीटर आहे. या पुलासाठी एकूण खर्च सुमारे 29 कोटी रूपयांचा आहे. श्रीखंडे कन्सलटंट प्रा.लि. हे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. तर मे. धनेश्‍वर कन्स्ट्रक्शनयांना या पुलाचे काम देण्यात आले आहे.

पर्यटनासाठी आकर्षक आराखडा
पुलास ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूस दोन-दोन लेन व दुभाजक देण्यात आले आहे. पुलाला जोडण्यासाठी दोन्ही बाजूस रस्ता देण्यात आला आहे. विद्युत रोषणाईसाठी दोन्ही बाजूस विदयुत खांब देण्यात आले आहेत. पुलाला दोन्ही बाजूस फुलपाखरू सारखे पंख कमान दिलेले आहेत. तसेच त्या पंख कमानीला लोखंडी रॅड पुलाचे वजन घेण्यासाठी दिलेले आहे. शहरासाठी आणि पर्यटनासाठी आकर्षक असा आराखडा योजला आहे. या पुलामुळे मोरया गोसावी यासारख्या धार्मिक स्थळांचे महत्त्व वाढणार आहे. पुलासाठी कॅलम नसल्याने पाण्याला अडथळा येणार नाही. पुलाच्या उद्घाटनाप्रसंगी उपमहापौर शैलजा मोरे, स्थानिक नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, अपर्णा डोके, आश्‍विनी चिंचवडे, कैलास बारणे, झामाबाई बारणे, अर्चना बारणे, मोरेश्‍वर शेडगे आदी उपस्थित होते.

ट्रॅफिक ‘जाम’ची समस्या सुटणार
स्थानिक नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी सांगितले की, आमदारांकडून वेळ मिळत नसल्यामुळे उद्घाटन थांबले होते. शेवटी त्यांनी महापौरांच्या उपस्थितीत उद्घाटन घेण्यास सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या पुलामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. याशिवाय ट्रॅफिक जाम होण्याची समस्या सुटणार आहे. वाकड, कस्पटे वस्ती, काळेवाडी, डांगेचौक यांच्यासाठी ही चांगली सोय झाली आहे.