हडपसर । अनेक महिन्यांपासून रखडलेला येथील ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता दुरुस्तीच्या कामाला महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली. महापालिकेने ग्रामस्थांच्या मागणीला उशिरा का होईना प्रतिसाद दिला व दुरुस्तीच्या कामाला गुरुवारी सुरुवात झाली. याबाबत ग्रामस्थांनी महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र दिले होते. फुरसुंगी ग्रामपंचायत महापालिकेत जाणार असल्याने अनेक वर्षे येथील रस्ता महाराष्ट्र शासनाने दुरुस्त केला नव्हता. त्यामुळे रस्त्याची चाळण होऊन अनेक अपघात या मार्गावर झाले असून कित्येकजण जखमी झाले आहेत.
नवीन रस्ता होणार
या आश्वासनाचे फुरसुंगी ग्रामस्थ शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल हरपळे, संजय हरपळे, भाऊसाहेब ढमाळ, दिनकर हरपळे, विजय हरपळे यांनी आयुक्तांशी भेट घेऊन स्मरणपत्र दिले. टेंडर प्रोसेसला वेळ लागेल त्यामळे आता रस्ता खड्डे मुक्त करून व येत्या एक महिन्यात टेंडर प्रक्रिया करून संपूर्ण नवीन रस्ता करण्यात येणार असल्याचे यावेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गाव महापालिकेत गेल्यानंतर ही भेकराईनगर, गंगानगर चौक ते फुरसुंगी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे काम होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली होती. ग्रामस्थांनी सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष या रस्ता दुरुस्तीच्या कामाबाबत मागणी केली होती. यावेळी महापालिका आयुक्तांनी दोन महिन्यांत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले होते.