अखेर वडगाव आनंद, आळेच्या हद्दीचा प्रश्‍न मार्गी लागणार

0

नारायणगाव । आळे ग्रामपंचायत आणि वडगाव आनंद ग्रामपंचायतचा हद्दीचा जुना असलेला प्रश्‍न अनेक दिवसांपासून वादात आहे. त्यावर अनेकदा विचारविनिमय होऊनसुद्धा हा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटला नाही. यातच आळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये कम्पाउंड करण्याची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना शासकीय परवानगी आहे, अशी खोटी माहिती देऊन एका व्यक्तीने आळे ग्रामपंचायत हद्दीमधील वडगाव आनंद शिवेवर अनधिकृत कम्पाउंड उभे केले होते. हे कम्पाउंड काढून घ्यावे आणि ग्रामपंचायत वडगाव आनंद आणि आळे यांच्यामार्फत केलेल्या संयुक्त मोजणीचे क पत्र व डिमार्केशन आल्यानंतर हद्दनिश्‍चिती करुन हद्दीचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतरच आळे हद्दीमध्ये बांधकामास सुरुवात करावी अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच शशिकांत लाड, उपसरपंच संतोष चौगुले आणि इतर सर्व नवनिर्वाचित सदस्य यांनी पदभार स्वीकारुन पहिल्याच दिवशी केली.

दोन्ही ग्रामस्थांकडून निर्णयाचे स्वागत
आळे ग्रामपंचायत हद्दीमधील व्यक्तीने तात्काळ काढून घ्यावी अशी तोंडी सूचना ग्रामपंचायत वडगाव आनंदमार्फत संबंधित व्यक्तिला देण्यात आली होती. त्यामुळे याविषयी संबंधित व्यक्तीशी चर्चा झाल्याने त्या व्यक्तीने अनाधिकृत भिंत काढली. कोणताही वाद न करता हा विषय हाताळला जाईल, असे सांगितले आहे. ग्रामपंचायत वडगाव आनंद आणि आळे यांच्यामार्फत व हद्दीलगतचे प्लॉटधारक यांची संयुक्तीक मोजणी डिमार्केशन पाहुन हद्दनिश्‍चिति करुन दोन्ही गावांचा हद्दीचा प्रश्‍न मार्गी लावावा, असा युक्तीवाद ग्रामपंचायत मार्फत काढण्यात आल्याने दोन्ही गावांच्या हद्दीचा प्रश्‍न मार्गी लागणार, असे चित्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायत वडगाव आनंदच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व आळेफाटा, वडगाव आनंद परिसरातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. यासंबंधी आळे गावच्या सरपंच वर्षाताई कुर्हाडे यांना फोनवरुन संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

समन्वयाने प्रश्‍न सोडवला
वडगाव आनंद व आळे ग्रामपंचायत यांनी संयुक्त मोजणी केली आहे. त्याचे क पत्र आणि डिमारर्केशन दाखला येणे बाकी आहे. तो लवकरच मिळणार आहे. तो आल्यावर हा जुना प्रश्‍न मार्गी लागणार आहे. त्यासाठी हद्दीवरील संबंधित व्यक्तींशी चर्चा करुन समन्वयाने हा प्रश्‍न सोडवला जाईल.
– शशिकांत लाड,
सरपंच, वडगाव आनंद