पुणे । गेले 10 दिवस सुरू असलेले सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थांचे बेमुदत उपोषण शनिवारी मागे घेण्यात आले. ‘सिंहगड’मधील प्राध्यापकांचे पगार गेले वर्षभर दिलेले नसून संस्थाचालक व व्यवस्थापन प्राध्यापकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे आधी प्राध्यापकांचा संप सुरू झाला व साखळीपद्धतीने उपोषण सुरू झाले. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन न केल्याने व परीक्षा जवळ आलेल्याने वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाल्यामुळे विद्यार्थांनी आधी साखळी उपोषण व नंतर आमरण उपोषण सुरू केले. विद्यार्थ्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मध्यस्थी केल्याने कुलगुरूंनी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आश्वासन दिले आहे.
आज सुमारे 40000 विद्यार्थांपुढील टांगती तलवार हटली आहे, असे आ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. एसटीईएसमधील प्राध्यापकांचे पगार गेले वर्षभर देण्यात आले नाहीत. संस्थाचालक व व्यवस्थापनाने प्राध्यापकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी संप व साखळीपद्धतीने उपोषण सुरू केले. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अध्यापनच न केल्याने व परीक्षा तोंडावर आलेल्या विद्यार्थ्यांपुढे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली. अभ्यासक्रम पूर्ण नसताना व विषय समजला नसताना परीक्षा कशी द्यायची? असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभा ठाकला आहे.
या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कमिटी सकारात्मक असल्याचे कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच या कालावधीत प्राध्यापक विद्यार्थांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करतील व विद्यार्थ्यांचे वर्ष वाचवण्याच्यादृष्टीने एकत्रित प्रयत्न करतील असे आश्वासनही त्यांनी दिले. आ. मेधा कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून कुलगुरूंकडून आश्वासन मिळाल्याने विद्यार्थांनी अखेर उपोषण मागे घेतले.
परीक्षा पुढे ढकलण्याबाबत बैठक
आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी विद्यार्थांची भेट घेतली व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विद्यार्थांची मागणी समजून घेतली. प्राध्यापकांच्या मागण्या त्यांची भेट घेऊन समजून घेतल्या व कुलगुरू नितीन करमळकर यांची प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासमवेत भेट घेऊन चर्चा केली. बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कमिटी सकारात्मक आहे असे कुलगुरू यांनी सांगितले, तसेच या कालावधीत प्राध्यापक विद्यार्थांना जरूर ते सर्व मार्गदर्शन करतील व वर्ष वाचवण्याच्या दृष्टीने एकत्रित प्रयत्न करतील असे आश्वासन आ. मेधा कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून मिळाल्याने विद्यार्थांनी उपोषण मागे घेतले आहे व भरपूर अभ्यास करून वर्ष वाचवण्यावर भर देण्यात येणार आहे. येत्या दि. 27 फेब्रुवारीला आ. कुलकर्णी यांच्यासमवेत विद्यार्थी व प्राध्यापक प्रतिनिधी मुख्यमंत्री वा शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन प्रशासक नेमण्याविषयी व इतर मागण्यांविषयी निवेदन देणार असल्याचे समजते.
प्रशासक नेमण्याविषयी निवेदन
येत्या 27 फेब्रुवारी आमदार कुलकर्णी यांच्यासमवेत विद्यार्थी व प्राध्यापक प्रतिनिधी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार आहेत.
या भेटीदरम्यान ते सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमण्याविषयी व इतर मागण्यांविषयी निवेदन देणार असल्याचे समजते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे.