अखेर विधानपरिषच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध

0
पृथ्वीराज देशमुख यांनी मागे घेतला अर्ज
नागपूर :  विधानपरिषद निवडणूकीत भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अखेर ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपची उमेदवारी न घेता रासपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १६ जुलैला निवडणूक होणार होती. ११ जागांसाठी भाजपाचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी १२ वा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूकीची रंगत वाढली होती. मात्र भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. रासपाचे उमेदवार आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, भाजपाचे विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि निलय नाईक, शिवसेनेचे अॅड. अनिल परब , मनिषा कायंदे , शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.
नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषदेत शपथ दिली. या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सर्वश्री कपिल हरिश्चंद्र पाटील, (मुंबई विभाग शिक्षक मतदार संघ), निरंजन वसंत डावखरे, (कोकण विभाग पदवीधर मतदार संघ), किशोर भिकाजी दराडे, (नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ), विलास विनायक पोतनीस, (मुंबई विभाग पदवीधर मतदार संघ) यांचा समावेश आहे.